'त्या' भ्रष्टाचाऱ्यांविरूद्ध फौजदारी कारवाई करा
By admin | Published: November 6, 2016 12:39 AM2016-11-06T00:39:27+5:302016-11-06T00:39:27+5:30
मृतकाच्या नावाने खोटे देयकाची उचल केलेल्या वरकडे, डब्ल्यु.आर. खान, टी.जी. घुले, गौरी नेवारे व आर.के. देशमुख यांच्या...
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : भीमसेनेची मागणी
भंडारा : मृतकाच्या नावाने खोटे देयकाची उचल केलेल्या वरकडे, डब्ल्यु.आर. खान, टी.जी. घुले, गौरी नेवारे व आर.के. देशमुख यांच्या भ्रष्ट्राचाराची शहानिशा करून फौजदारी कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी भीम सेना संघटनेनी जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
मौजा दिघोरी येथील मिश्र रोपवन सन २०१४-१५ ला जंगल गट क्रमांक १४७, १५२, १५५, १५६, १५७ या क्षेत्रात टी.सी.एम. खोदणे व इतर कामाचे ३,९९ हजार ११० रूपयाचे व्हाऊचर तयार करून शासनाची दिशाभूल व फसवणूक करून या वन अधिकाऱ्यांनी लाखो रूपयाचा अपहार केला.
मौजा कोकणागड येथील संरक्षीत वनक्षेत्रात जंगलांना वनवा लागू नये , यासाठी जाळरेषा तयार करण्याच्या दिवस मंजूर म्हणून २० मार्च २०१५ पर्यंत काम केल्याचे दर्शविण्यात आले. तसेच नारायण दसाराम अंबादे २८ नोव्हेंबर १९९६ ला मृत पावले. त्या मृतकाने सुद्धा २८ जानेवारी २०१५ पर्यंत मजूर म्हणून काम केल्याचे दर्शवून शासनाची फसवणूक करून लाखो रूपयांचा अपहार करण्यात आला. भ्रष्टाचार दडपण्यासाठी मृताच्या कुटूंबियांचे बयान नोंदविण्यात आले आहे. त्या कुटूंबियाविरूद्ध कारवाईची मागणी होत आहे.
लाखोचा भ्रष्टाचार उघड येवू नये, यासाठी वनक्षेत्र अधिकारी, मेश्राम यांना मागासवर्गीय असल्या कारणामुळे खोट्या प्रकरणात अडवून निलंबित करण्यात आले. भ्रष्टाचारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना वरिष्ट अधिकारी अभय देत असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून शासनाच्या लाखो रूपयाच्या निधीचा अपहार करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचेवर फौजदारी गुन्हा दाखल करवून शासन सेवेतून तात्काळ बडतर्फ करावे, अशी मागणी आहे.
प्रकरणाची गांभीर्याने दखल न घेतल्यास भिमसेना कार्यकर्ते रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. काही अप्रिय घटना घडल्यास संपूर्ण जबाबदारी शासनाची राहील, असा इशारा राजेश मेश्राम, महेश बागडे, रोशन कोचे, निरज साखरे यांनी दिला आहे. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, वनमंत्री, वनसचिव, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक, प्रशासन व दुय्यम संवर्ग नागपूर, उपवनसंरक्षक भंडारा आदींना पाठविले आहे. (नगर प्रतिनिधी)