जुन्या पेन्शनसाठी शिक्षकांचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 09:02 PM2019-01-06T21:02:48+5:302019-01-06T21:03:32+5:30
जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीला घेऊन खासगी प्राथमिक शिक्षक संघ शाखा भंडाराच्या वतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो शिक्षकांनी धरणे दिले. शासनाचे या आंदोलनाच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीला घेऊन खासगी प्राथमिक शिक्षक संघ शाखा भंडाराच्या वतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो शिक्षकांनी धरणे दिले. शासनाचे या आंदोलनाच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात आले.
राज्यातील आदिवासी, सामाजिक न्याय विभाग, ग्रामविकास, नगर विकास शालेय शिक्षण, आश्रमशाळा, अंध, अपंग समावेशित शाळा आदी विभागात अनेक वर्षांपासून शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र त्यांच्या मागण्यांकडे शासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. एकीकडे पाच वर्ष कार्यकाळ पुर्ण झालेल्या आमदार व खासदारांना भरघोस पेन्शन एकमताने मंजूर केली जाते. तर ३० ते ३५ वर्ष सेवा करणाऱ्या शिक्षकांची जुनी पेन्शन बंद करुन त्यांचा मुळ हक्कापासून डावलले जात आहे. ही शासनाची दुटप्पी धोरण आहे. त्यामुळे या सर्व विभागातील शिक्षकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्न म्हणजे जुनी पेन्शन योजना आहे. ‘एकच मिशन जुनी पेन्शन’ या घोषणे अंतर्गत खाजगी प्राथमिक शिक्षक संघाने लढा उभारला आहे. शनिवारी शेकडोच्या संख्येने आयोजित धरणे आंदोलनाला पाठींबा देत शिक्षकांनी उपस्थिती दर्शविली.
मागण्यांमध्ये जुनी पेन्शन योजना सरसकट मंजूर करणे, सर्व विभागातील शिक्षकांचे वेतन १ तारखेला देणे, सन २०१२-१३ पासून संचमान्यता दुरुस्ती प्रस्ताव निकाली काढणे, वर्ग ६ ते ८ च्या शिक्षकांना पदवीधर श्रेणी लागू करणे, वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी विना अट मंजूर करणे, टप्पावरील शाळांचे अनुदान मंजूर करणे, १ ते ७च्या प्राथमिक शाळेत लिपीक व शिपाई पद मंजूर करणे, काम नाही वेतन नाही हा आदिवासी विभागाचा आदेश रद्द करणे, २ मे २०१२ पूर्वीच्या शिक्षकांना टीईटी परिक्षेची सक्ती करु नये, सेवानिवृत्त प्रभारी मुख्याध्यापक रामचंद्र मेश्राम यांची पेन्शन योजना मंजुर करावी, शिवदास भालाधरे, सोहनलाल पारधी यांचे थकीत वेतन अदा करावे मागण्यांचा समावेश आहे.
निवेदन देतांना मार्गदर्शक राजेश धुर्वे, सुधाकर देशमुख, केंद्रीय सचिव विजय नंदनवार, जिल्हाध्यक्ष दारासिंग चव्हाण, सचिव विलास खोब्रागडे, जिल्हा कार्याध्यक्ष धनविर कान्हेकर, ज्ञानेश्वर मेश्राम, प्रसन्न नागदेवे, अरुण मोखारे, प्रेमलाल मलेवार, रेहमतुल्ला खान, कुणाल जाधव, योगेश्वरी उमप, अरविंद नानोटी, जयंत पंचबुध्दे, जीवनसिंग खसावत आदी यांच्यासह मंडपात शेकडो शिक्षकगण उपस्थित होते.