दोन हजारांची लाच घेताना तलाठी जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:08 AM2018-01-23T00:08:55+5:302018-01-23T00:09:14+5:30
न्यायालयाच्या आदेशानुसार वडीलोपार्जित शेतीचे फेरफार करण्याकरिता शेतकऱ्याला तलाठ्याने दोन हजार रूपयांची मागणी केली.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : न्यायालयाच्या आदेशानुसार वडीलोपार्जित शेतीचे फेरफार करण्याकरिता शेतकऱ्याला तलाठ्याने दोन हजार रूपयांची मागणी केली. लाच घेताना भंडारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून तलाठ्याला रंगेहात अटक केली. ही कारवाई सोमवारला दुपारी मोहाडी तालुक्यातील धुसाळा येथे करण्यात आली.
युवराज महिराम उके (५२) असे लाच घेणाºया तलाठ्याचे नाव आहे. धुसाळा येथील फिर्यादी यांची ११ एकर शेती आहे. गट क्रमांक ४१०/१/२ मधील ही शेती न्यायालयाच्या आदेशानुसार तक्रार कर्त्यांच्या वडीलांच्या नावाने झाली. वरील वडीलोपार्जित ११ एकर शेतीचे फेरफार घेण्यासाठी सदर तलाठी उके यांना ६ नोव्हेंबरला अर्ज केला. परंतु आजपावेतो वरील शेतीचे फेरफार घेण्यात आले नाही. त्यामुळे तक्रार कर्ते हे शुक्रवारला तलाठी उके यांना भेटून फेरफार करण्याची विनंती केली.
तलाठी उके यांनी फेरफार घेण्यासाठी दोन हजार रुपयांची मागणी केली. मात्र तक्रारकर्त्यांची मानसिकता नसल्याने त्यांनी याप्रकरणी भंडारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन सापळा रचून तलाठी युवराज उके यांना दोन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
याप्रकरणी आंधळगाव पोलीस ठाण्यात उके यांच्याविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक दिनकर सावरकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी, सहायक फौजदार गणेश पडवार, पोलीस हवालदार धनंजय कुरंजेकर, पोलीस नायक गौतम राऊत, सचिन हलमारे, अश्विन कुमार गोस्वामी, पराग राऊत, शेखर देशकर, कोमलचंद बनकर, दिनेश धार्मिक आदीनी केले.