तलाठी, मंडळ अधिकारी बेमुदत सामूहिक रजेवर
By admin | Published: November 17, 2016 12:35 AM2016-11-17T00:35:29+5:302016-11-17T00:35:29+5:30
शेतकऱ्यांना विनाविलंब अचूक सातबारा, नमूना ८ व इतर कामे विहीत वेळेत व्हावे असे शासनासह सर्वांनाच वाटते.
शेतकऱ्यांची गैरसोय : धान खरेदी होणार प्रभावित, ग्रामीण भागातील कामे ठप्प
पालांदूर/लाखनी : शेतकऱ्यांना विनाविलंब अचूक सातबारा, नमूना ८ व इतर कामे विहीत वेळेत व्हावे असे शासनासह सर्वांनाच वाटते. परंतु त्याकरिता प्रामाणिक प्रयत्नांची पराकाष्टा शासनस्तरावरून न होता केवळ पोकळ आश्वासनांची सरबत्ती सुरु आहे. लाखनी तालुक्यातील तलाठी / मंडळ अधिकारी बेमुदत सामूहिक रजेवर गेले असून त्यांनी तहसीलदार राजीव शक्करवार यांना मागण्यांचे निवेदन दिले आहे.
शेतकरी व शासनाचा दुवा म्हणून तलाठी काम करतो. त्याला येणाऱ्या अडचणींचा पुरेपुर विचार करून सेवा सुरळीत करणे शासनाचे काम आहे. खेडोपाडी इंटरनेट सेवा नाही. चांगल्या दर्जाची संगणक व इतर साहित्य पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. तलाठ्यांना स्वत:चे कार्यालय नाही. अशा अडचणींची माहिती दोन वर्षापासून शासनाला सांगण्यात आली होती. परंतु सुधारणा न झाल्याने तलाठी, मंडळ अधिकारी बेमुदत रजेवर जाण्याचा ईशारा दिला होता. तहसीलदारांना निवेदन देताना जिल्हा सचिव टी.आर. गिऱ्हेपुंजे, जे.एच. गेडाम व विदर्भ पटवारी संघाचे तालुक्यातील तलाठी व मंडळ अधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)
आल्यापावली परतावे लागले शेतकऱ्यांना
आमगाव/ साकोली : जिल्ह्यातील तलाठी व मंडळ अधिकारी सामूहिक रजेवर गेले असल्याने गावागावातील साझामधील कामे पूर्णपणे ठप्प झाले असून शेतकऱ्यांना दाखल्यासाठी व सातबारासाठी आल्यापावली परत जावे लागत आहे.
तलाठी साझ्याची व महसूल मंडळाची पुनर्रचना करणे, सातबारा संगणीकरण व ई फेरफार मधील अडचणी दूर करणे, तलाठी व मंडळ अधिकारी यांना पायाभूत प्रशिक्षण देणे, अवैध गौण खनिज वसुली या कामामधून तलाठी संवर्गास वगळणे, कार्यालयासाठी इमारत बांधून देणे, पदोन्नतीसाठी द्विस्तरीय पद्धतीचा अवलंब करणे, २५ टक्के पदे खात्यांतर्गत कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवणे, अंशदायी निवृत्ती वेतन योजना बाबत निर्णय घेणे, अव्वल कारकून संवर्गातील पदे भरणे, वेतनश्रेणीत वाढ करणे इ. मागण्या संदर्भात ३ ते ५ नोव्हेंबरला काळ्या फिती लावून काम केले. ७ नोव्हेंबरला तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. १० नोव्हेंबरला अतिरिक्त कार्यभाराच्या चाव्या जमा करण्यात आले. मात्र मागण्या मान्य न झाल्यामुळे १६ नोव्हेंबर पासून सर्व तलाठी व मंडळ अधिकारी सामूहिक रजेवर गेले आहेत. हलक्या धानपिकाची मळणी झाली असून तीविक्री करण्यासाठी शेतकरी आधारभूत धान खरेदी केंद्रावर नेत आहेत. मात्र तिथे सातबाराची गरज असल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. (वार्ताहर)