थेंबथेंब गळतेय पालोराचे तलाठी कार्यालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:42 AM2021-09-14T04:42:10+5:302021-09-14T04:42:10+5:30
करडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील पालोरा साझा क्रमांक ३२ येथील तलाठी कार्यालयाचे बांधकाम २००८-०९ मध्ये करण्यात आले. मात्र, निकृष्ट ...
करडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील पालोरा साझा क्रमांक ३२ येथील तलाठी कार्यालयाचे बांधकाम २००८-०९ मध्ये करण्यात आले. मात्र, निकृष्ट दर्जाचे बांधकाम झाल्याने आता भर पावसाळ्यात स्लॅबला तळे जाऊन स्लॅब थेंबथेंब गळू लागले आहे. त्यामुळे तलाठ्याला कार्यालयात नागरिकांचे कामे करण्यास अडचण निर्माण होत आहे. तलाठी व नागरिक तिथं उभे राहू शकत नाही. दुरवस्था झालेल्या तलाठी कार्यालयाची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
१३ वर्षांपूर्वी बांधकाम झालेल्या तलाठी कार्यालय इमारतीचे स्लॅब भंगले आहे. स्लॅबचे फोफले निघाले आहेत. पाऊस पडताच स्लॅबमधून पाणी गळायला लागते. स्लॅब गळत असल्याने भिंतीला तडे गेलेल्या इमारतीतून तलाठ्याचे कामकाज सुरू आहे. पाऊस येताच कार्यालयातील कामकाज थांबवून रेकॉर्ड गुंडाळून ठेवावा लागतो. परिणामी वेळेत नागरिकांची व शासनाचे कामकाज होत नाही. दुसऱ्या दिवशी उर्वरित कामांसाठी नागरिकांना तलाठी कार्यालयात यावे लागते. त्यामुळे वेळ व पैशाचा अपव्यय होत आहे.
नागरिकांची कामे वेळेत होण्याकरिता तलाठी कार्यालय इमारतीचे नव्याने बांधकाम करण्यात यावे, जेणेकरून पावसामुळे रेकॉर्ड खराब होऊ नये. एखादा रेकॉर्ड भिजून खराब झाला तर नागरिकांना दुसऱ्यांदा रेकॉर्ड मिळणार नाही, याची गांर्भीयाने दखल घेण्यात यावी. वरिष्ठांनी तत्काळ लक्ष देऊन पालोरा येथे नवीन तलाठी इमारत मंजूर करावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य भोजराम तिजारे यांनी केली आहे.
जांभोरा तलाठी कार्यालयाची दुरवस्था
पालोराप्रमाणेच जांभोरा तलाठी कार्यालयाची दुरवस्था झालेली आहे. टिनाचे शेड गंज लागून सडले आहेत, तर भिंतीला भेगा पडल्या आहेत. जागोजागी तडे गेले असल्याने तलाठ्यांना कार्यालयात बसताना दहादा विचार करावा लागतो. निकृष्ट बांधकामाचा फटका येथील कार्यालयाला बसल्याने तत्काळ कार्यालय दुरुस्तीची मागणी सरपंच वनिता राऊत, माजी सरपंच भुपेंद्र पवनकर यांनी केली आहे.
130921\img-20210913-wa0101.jpg
थेंबथेंब गळतेय पालोराचे तलाठी कार्यालय
पालोरा तलाठी कार्यालय इमारत