‘तंमुस’ अध्यक्षाला द्यावा लागेल चारित्र्याचा दाखला
By admin | Published: March 21, 2016 12:26 AM2016-03-21T00:26:43+5:302016-03-21T00:26:43+5:30
तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी विराजमान होणे आता कठीण झाले आहे.
भंडारा : तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी विराजमान होणे आता कठीण झाले आहे. अध्यक्ष होऊ इच्छिणाऱ्यांना आता पोलिसांकडून चारित्र्याचा दाखला घ्यावा लागणार आहे. तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांच्या निवडणुकीत अनेक तंटे निर्माण होत असल्याने शासनाने हा निर्णय घेतला आहे.
'शांततेतून समृद्धीकडे' असे ब्रीदवाक्य घेऊन २००७ मध्ये शासनाने महात्मा गांधी तंटामुक्ती गाव अभियानाची सुरुवात केली आहे. गावातील तंटे गावातच मिटावेत तसेच गावाची आर्थिक परिस्थिती सुधारून गावाच्या विकासाला चालना मिळावी, यासाठी सुरू करण्यात आलेल्या तंटामुक्ती मोहिमेच्या अध्यक्षपदासाठीच गावात तंटे निर्माण होत आहेत. या समितीच्या अध्यक्षपदाची सुत्रे गुंडप्रवृत्ती, अवैध धंदे करणारे यासह समाजात तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींच्या लोकांच्या हाती जाऊ नये, यासाठी शासनाने यापुढे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष व्हायचे असेल तर अध्यक्षपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असणाऱ्यांना आता प्रथम संबंधित पोलिस ठाण्यातून वर्तणूक दाखला घ्यावा लागणार आहे. समितीच्या अध्यक्षपदावर असणाऱ्या अध्यक्षाने किंवा समितीमधील सदस्यांनी जर गैरवर्तन केले तर त्यांचे पद तात्काळ रद्द करण्याचा आदेश काढला आहे.
तंटामुक्ती मोहिमेची सक्षमपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय, पोलिस ठाण्यांच्या पातळीवर व गावपातळीवर तंटामुक्ती समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या समित्या स्थापन करताना यामध्ये गुंडप्रवृत्ती नसलेले, अवैध धंदे करत नसलेले, प्रतिष्ठीत, समजुतदार, सामाजिक प्रश्नांची जाण असलेले, नि:स्वार्थी, चांगले चारित्र्य व निर्व्यसनी असलेल्या व्यक्तींचा समावेश करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.
गुंडप्रवृत्ती, कडव्या जातीय विचारसणीचे, अवैध धंदे करणारे, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या ग्रामस्थांना या समितीच्या पदांपासून लांबच ठेवण्यासाठी शासनाने नव्याने ही तरतूद केली आहे. गावात शांतता टिकून राहावी व गावाच्या विकासाला चालना मिळावी यासाठी सुरू करण्यात आलेल्या मोहिमेला जिल्ह्यासह राज्यात चांगला प्रतिसाद मिळत असताना अनेक गावांमध्ये अध्यक्षपदासाठी गुंडप्रवृत्तीच्या व्यक्तीची निवड होत होती. हा प्रकार आता बंद होणार आहे. (नगर प्रतिनिधी)