टँकरमुक्त जिल्ह्यात अवर्षणाची चिन्हे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 10:43 PM2017-12-26T22:43:39+5:302017-12-26T22:44:02+5:30

Tanker free district signs of drought? | टँकरमुक्त जिल्ह्यात अवर्षणाची चिन्हे?

टँकरमुक्त जिल्ह्यात अवर्षणाची चिन्हे?

Next
ठळक मुद्दे६५३ गावांमध्ये होणार पाणीटंचाईची कामे : कमी पर्जन्यमानाचा फटका

इंद्रपाल कटकवार ।
आॅनलाईन लोकमत
भंडारा : संसाधनांच्या बाबतीत विपुल समजल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात मागील काही दशकांपेक्षा आमागी वर्षात जिल्हावासियांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे. कमी पर्जन्यमानामुळे कधी नव्हे त्या जवळपास जिल्ह्यातील ६५३ गावांमध्ये संभाव्य पाणीटंचाईची निवारणार्थ कामे प्रस्तावित करण्यात आली आहे. परिणामी टँकरमुक्त जिल्ह्यात अवर्षणाची चिन्हे दिसू लागली आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
एकेकाळी तलावांचा जिल्हा म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला भंडारा जिल्हा आज दुसऱ्या क्रमाकांवर पोहचलेला आहे. माजी मालगुजारी तलावांसह अन्य तलावांच्या देखरेखीकडे दुर्लक्ष, पाण्याची नासाडी व जल पुर्नभरणाच्या कामांकडे सातत्त्याने दुर्लक्ष होत गेले. दुसरीकडे वातावरणातील बदल, परिणामी निसर्गचक्र बदलल्यामुळे जिल्ह्यात पावसाने सरासरीही गाठलेली नाही. परिणामी जिल्हा प्रशसानाने संभाव्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना तीन टप्प्यांमध्ये प्रस्तावित केल्या आहेत.
दोन टप्प्यात होणार कामे
जिल्हा हा टँकरमुक्त असल्याने टँकर बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करण्याबाबत कुठलेही नियोजन करण्यात आलेले नाही. सदर नियोजनांतर्गत पहिल्या टप्प्यात जानेवारी ते मार्च या मध्ये ७८ लक्ष ७३ हजारांचा खर्च पाणीटंचाईच्या निवारणार्थ खर्च केल्या जाणार आहे. विशेष म्हणजे पहिला टप्पा डिसेंबर महिन्यातच संपणार आहे. एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत संभाव्य पाणी टंचाई निवारणार्थ बृहत आराखड्यानुसार २६४ गावांमध्ये कामे केली जाणार आहेत.
१ कोटी १२ लाखांचा खर्च
संभाव्य पिण्याचे पाणी टंचाई निवारणार्थ जानेवारी ते जून या दोन टप्प्यांतर्गत ६५३ गावांमध्ये कामे केली जाणार आहेत. यात विहिरी खोल करणे, गाळ उपसणे, खासगी विहिरींचे अधिग्रहण करणे, नळयोजनेची दुरुस्ती करणे, विंधन विहिरींची दुरुस्ती करणे आदी कामांचा समावेश आहे. यासाठी १ कोटी १२ लाखांचा खर्च अपेक्षित असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.


यावर्षी कमी पर्जन्यमान बरसल्यामुळे पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता यावर्षी जलपुनर्रभरणाकडे अधिक लक्ष दिले जाणार आहे. विशेष म्हणजे सर्वात प्रथम पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यावर जिल्हा प्रशासनाचा उद्देश आहे. त्यानंतर शेतीव्यवसायासाठी पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. रोहयोच्या माध्यमातूनही जलस्त्रोत निर्माण करण्यावर भर दिला जात आहे.
-मनिषा दांडगे,
उपजिल्हाधिकारी, रोहयो, भंडारा.

Web Title: Tanker free district signs of drought?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.