तुमसर बाजार समिती लावणार ‘चेकपोस्ट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2017 12:24 AM2017-04-19T00:24:07+5:302017-04-19T00:24:07+5:30
शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळून त्यांची आर्थिक लुट होऊ नये तथा परप्रांतीय व्यापारी बांधावर जाऊन शेतमाल खरेदी करण्यापासून रोखण्याकरिता ....
११ चेकपोस्टचा समावेश : बांधावर शेतमाल खरेदी करू शकणार
मोहन भोयर तुमसर
शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळून त्यांची आर्थिक लुट होऊ नये तथा परप्रांतीय व्यापारी बांधावर जाऊन शेतमाल खरेदी करण्यापासून रोखण्याकरिता व बाजार समितीला सेसचे आर्थिक नुकसान होऊ नये याकरिता तुमसर कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसर व मोहाडी तालुक्यात ११ चेकपोष्ट लावणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव सहकार व पणन मंत्रालयालाकडे सादर करण्यात आला आहे.
तुमसर-मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समिती धानाकरिता विदर्भात प्रसिद्ध आहे. येथील बाजारपेठेत धानाची विक्रमी आवक होते. परंतु तुमसर व मोहाडी तालुक्यात परप्रांतीय व्यावसायिक व पश्चिम विदर्भातील व्यावसायीक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन धानासह इतर शेतीमाल खरेदी करीत आहेत. यात शेतकऱ्यांना शेतमालाला रास्त भाव मिळत नाही. यात त्यांची आर्थिक लूट केली जाते. बाजार समितीला दरवर्षी लाखोंच्या सेसपासून मुकावे लागत आहे. त्यातून मार्ग काढण्याकरिता तथा नियमबाह्य खरेदी रोखण्याकरिता तुमसर बाजार समितीने सहकार व पणन मंत्रालयाला परवानगी मागितली आहे.
तुमसर व मोहाडी तालुक्यात ११ चेकपोष्ट लावण्याची परवानगी सहकार खाते, महसूल विभाग, वनविभाग, जिल्हाधिकारी तथा पोलीस अधीक्षक कार्यालयांना मंजुरी मागितली आहे. मंजुरीनंतर ११ चेकपोष्ट येथे लावण्यात येणार आहेत. चेकपोष्ट लावण्यामागील कारणासह बाजार समितीने संबंधित कार्यालयांना माहिती सादर केली आहे. चेकपोष्ट लावल्यानंतर परप्रांतीय तथा इतर व्यापाऱ्यांना बांधावर जाऊन तथा शेतकऱ्यांकडून सरळ धान्य खरेदी करता येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना बाजार समितीमार्फत शेतमाल विक्री करावे लागणार आहे. या चेकपोष्टवर बाजार समितीचे कर्मचाऱ्यांचे तपासणी पथक तैनात करण्यात येणार आहे.
तुमसर कृषी उत्पन्न बाजार समिती हायटेक होण्याच्या मार्गावर आहे. येथील शेतमाल आॅनलाईन खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध असून बाजारपेठेवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची करडी नजर आहे. येथील सभापती, उपसभापती तथा संचालक मंडळ या बाजार समितीला क्रमांक एकची बाजार समिती कशी होईल या दिशेने प्रयत्नरत आहेत.
शेतकऱ्यांना शेतमालाचे रास्त भाव मिळावा, आर्थिक लुट होऊ नये व बाजार समितीला सेस पासून मुकावे लागू नये, याकरिता नियमानुसार तुमसर- मोहाडी तालुक्यात ९ ते ११ चेकपोस्ट लावण्याकरिता संबंधित विभागाकडे पाठपुरावा सुरु आहे.
-अनिल भोयर,
प्रभारी सचिव, तुमसर कृषी उत्पन्न बाजार समिती, तुमसर.