तुमसरच्या डॉक्टरांनी केली अन्न नलिकेची शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 12:30 AM2018-12-09T00:30:19+5:302018-12-09T00:31:26+5:30
अन्ननलिकेचा दुर्धर आजार जडलेल्या महिलेने महानगरासह विविध ठिकाणी उपचार घेतले. नामवंत डॉक्टरांनी हात वर केल्यावर जगण्याची कोणतीच आशा नव्हती. अशा परिस्थितीत तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत एका डॉक्टरने एन्डोस्कोपीद्वारे जटील शस्त्रक्रिया केली.
राहुल भुतांगे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : अन्ननलिकेचा दुर्धर आजार जडलेल्या महिलेने महानगरासह विविध ठिकाणी उपचार घेतले. नामवंत डॉक्टरांनी हात वर केल्यावर जगण्याची कोणतीच आशा नव्हती. अशा परिस्थितीत तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत एका डॉक्टरने एन्डोस्कोपीद्वारे जटील शस्त्रक्रिया केली. आता त्या महिलेच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली. उपजिल्हा रुग्णालयात नव्याने रुजू झालेले डॉक्टर सौरभ कुंभारे या महिलेसाठी देवदूत ठरले.
सुनिता पटले (३०) रा.मांगली ता.तुमसर असे अन्न नलिकेचा आजार जडलेल्या महिलेचे नाव आहे. दोन वर्षापूर्वी तिचा विवाह तिरोडा तालुक्यातील एका सैन्यदलातील जवानासोबत झाला होता. तो देशसेवेसाठी कार्यरत होता. इकडे गावी पत्नी परिवारासोबत राहत होती. अशातच तिला भोजन करताना त्रास जाणवू लागला. अन्न पोटात जाताच तिला खूप वेदना होऊ लागल्या. त्यामुळे तिचे खाणे बंद झाले.
केवळ दूध आणि पाण्यावर ती दिवस काढू लागली. ४० किलो वजनाची सुनिता अवघ्या काही दिवसात २४ किलोची झाली. खाटेवर मरणासन्न अवस्थेत पडून राहायची. हा प्रकार तिच्या वडीलांना पाहावला नाही. त्यांनी तिला तुमसर येथे उपचारार्थ आणले. भंडारा, नागपूर व मोठ्या शहरातील नामवंत डॉक्टरांना दाखविले. सुरुवातीला डॉक्टरांनी कॅन्सरचे निदान केले. नंतर अन्न नलिका चोक झाल्याचे समोर आले. मात्र उपचार करण्यासाठी सर्वांनीच हात वर केले. आता तिला आपले मरण डोळ्यापुढे दिसू लागले. अशातच तुमसरच्या उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर सौरभ रमेश कुंभारे रूजू झाल्याची माहिती मिळाली. वडीलांनी मोठ्या आशेने त्यांच्याकडे आणले. त्यांनी सुनिताच्या अन्ननलिकेच्या तुकड्याची तपासणी केली. आजाराचे निदान लागले. त्यानंतर एन्डोस्कोपीद्वारे कुठलीही इजा न पोहचविता सुनितावर शस्त्रक्रिया केली. उपजिल्हा रुग्णालयात एन्डोस्कोपीची सुविधा नसल्याने शहरातीलच एका खासगी रुग्णालयाची मदत घेण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर सुनिताच्या प्रकृतीत फरक जाणवू लागला. वजनातही वाढ होऊ लागली. आता पातळ अन्न, फळे ती ग्रहण करते. तिचे चालणे, फिरणे सुरु झाले असून जणू सुनिताला पुनर्जन्मच मिळाला.
सीआयई बलून शस्त्रक्रिया आतापर्यंत नागपूर सारख्या शहरात होत होती. ती सर्वसामान्यांना परवडणारी नव्हती. मी तुमसरच्या मातीत जन्माला आल्याने शहरवासीयांसाठी काही करता येईल या उद्देशाने सुनितावर शस्त्रक्रिया केली. यात तिची प्रकृती ठणठणीत झाली. याचा मला आनंद आहे.
-डॉ.सौरभ कुंभारे, तुमसर.