संविधान बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना धडा शिकवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 01:01 AM2019-04-04T01:01:19+5:302019-04-04T12:51:09+5:30
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात एकता, समानता आणि न्याय देण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी पवित्र संविधान लिहिले. याच संविधानामुळे नारिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य व मुलभूत अधिकार मिळाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात एकता, समानता आणि न्याय देण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी पवित्र संविधान लिहिले. याच संविधानामुळे नारिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य व मुलभूत अधिकार मिळाले आहे. मात्र विद्यमान भाजप सरकार यात बदल करण्याचा प्रयत्न करीत नागरिकांच्या हक्क आणि मुलभूत अधिकारावर गदा आणण्याचा प्रयत्न करीत आहे. संविधानात बदल करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना या निवडणुकीत धडा शिकवून त्यांची जागा दाखवून द्या असे प्रतिपादन खा.प्रफुल्ल पटेल यांनी केले.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाआघाडीचे अधिकृत उमेदवार नाना पंचबुध्दे यांच्या निवडणूक प्रचारार्थ मंगळवारी गोंदिया तालुक्यातील खमारी, फुलचूर, नागरा, मरारटोली, कुडवा येथे आयोजित प्रचार सभेला संबोधित करताना ते बोलत होते.
आमदार गोपालदास अग्रवाल, उमेदवार नाना पंचबुध्दे, उपस्थित होते. प्रफुल्ल पटेल म्हणाले, जेव्हा राजधानी दिल्लीत संविधानाच्या प्रतिकात्मक प्रती जाळून संविधानाचा अवमान केला जात होता. तेव्हा स्वत:ला देशाचा चौकीदार समजणारे कुठे होते असा सवाल केला.
मागील ७० वर्षांपासून देशाची लोकशाही ज्या संविधानाच्या आधारावर सुरू आहे. त्यामुळे देशात एकता, समानता, बंधूता टिकून त्याच संविधानाला बदलण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. तर दुसरीकडे भाजपचे प्रवक्ता शेतकऱ्यांच्या मुलांना लावारिस म्हणत आहे. ज्यांनी मागील पाच वर्षात केवळ आश्वासनाशिवाय काहीच दिले नाही, त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची हिच वेळ असल्याचे सांगितले.