शिक्षकच प्रगत राष्ट्र करु शकतो
By admin | Published: October 12, 2015 01:08 AM2015-10-12T01:08:49+5:302015-10-12T01:08:49+5:30
शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी घट्ट नाते जोडले पाहिजे. विद्यार्थ्यांसाठी अधिक वेळ देऊन त्यांना प्रगतीकडे नेले पाहिजे.
राजेश डोंगरे यांचे प्रतिपादन : अड्याळ येथे कार्यप्रेरणा शिबिर
अड्याळ : शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी घट्ट नाते जोडले पाहिजे. विद्यार्थ्यांसाठी अधिक वेळ देऊन त्यांना प्रगतीकडे नेले पाहिजे. इतर व्यावसायिक भ्रष्ट झाले तरी फारसे काही बिघडणार नाही परंतु शिक्षक भ्रष्ट झाला तर संपूर्ण राष्ट्राचा डोलाराच कोसळू शकतो. कारण शिक्षकच प्रगत राष्ट्राची संकल्पना साकार करु शकतो, असे प्रतिपादन जिल्हा परिषद उपाध्यक्ष व शिक्षण समितीचे सभापती राजेश डोंगरे यांनी केले.
समूह साधन केंद्र अड्याळ येथे आयोजित पायाभूत चाचणीत्तर शिक्षकांच्या कार्यप्रेरणा शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
नुकतेच समूह साधन केंद्र अड्याळतर्फे इयत्ता १ ते ८ च्या शिक्षकांसाठी पायाभूत चाचणीत्तोर कार्यपे्ररणा शिबिराचे आयोजन ज्ञानप्रबोधिनी कक्ष अड्याळ येथे करण्यात आले होते.
अध्यक्षस्थानी उपसरपंच देवीदास नगरे होते. प्रमुख अतिथी उच्चश्रेणी मुख्याध्यापिका मंगला आदे उपस्थित होत्या. याप्रसंगी राजेश डोंगरे आणि देवीदास नागरे यांचा समूह साधन केंद्र अड्याळतर्फे यथोचित सत्कार करण्यात आला.
पायाभूत चाचणीत्तर कार्यपे्ररणा शिबिराच्या आयोजनामागील सविस्तर भूमिका केंद्रप्रमुख प्रमोदकुमार अणेराव यांनी विशद केली. तसेच मान्यवरांनी आणि विविध क्षेत्रातील व्यक्तीनी शैक्षणिक उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन केले. या कार्यप्रेरणा शिबिरास केंद्रातील ८० शिक्षक उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलकंठ डेकाटे सहायक शिक्षक पिलांद्री यांनी आणि आभारप्रदर्शन फंदे सहायक शिखक गांधी विद्यालय विरली यांनी केले.
कार्यक्रमासाठी यशवंत लोहकर, वैशाली देशमुख, मीनाक्षी घोडमारे, भगवान जाधव यांनी अथक परिश्रम घेतले. (वार्ताहर)