शिक्षकासाठी पालक एकवटले
By admin | Published: February 12, 2017 12:26 AM2017-02-12T00:26:15+5:302017-02-12T00:26:15+5:30
तालुक्यातील खुटसावरीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापकाच्या दीर्घकालीन वैद्यकीय रजेमुळे येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
खुटसावरीत वर्ग चार, शिक्षक एक : आंदोलनाचा इशारा, नीलकंठ कायते यांची शाळेला भेट
भंडारा : तालुक्यातील खुटसावरीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापकाच्या दीर्घकालीन वैद्यकीय रजेमुळे येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. नवीन शिक्षकाची नियुक्ती करण्यात यावी, या मागणीसाठी पालकांनी जिल्हा परिषद सदस्य निलकंठ कायते यांना खुटसावरी येथे पाचारण करून त्यांच्या समोर समस्यांचा पाडा वाचला. निलकंठ कायते यांनी १५ दिवसात समस्या मार्गी लागेल, असे आश्वासन पालकांना दिले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खुटसावरी येथे इयत्ता १ ते ४ मध्ये ३१ विद्यार्थी विद्यार्जनाचे धडे घेत आहेत. पटसंख्या कमी असल्यामुळे या शाळेत दोन शिक्षकांची नियुक्ती असणे बंधनकारक आहे. मात्र सध्यस्थितीत येथील कारभार एका शिक्षिकेच्या खांद्यावर आहे. येथील मुख्याध्यापक गेडाम हे अनेक महिन्यांपासून रजेवर आहेत. त्यांनी १५ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर रोजी किरकोळ रजा, १८ नोव्हेंबर ते १८ जानेवारीपर्यंत पुन्हा रजेवर गेले.
१९ जानेवारीला ते शाळेत रूजू झाले. त्यानंतर मात्र २३ जानेवारीपासून पुन्हा वैद्यकीय रजेवर गेले आहे. त्यामुळे येथील शिक्षणाचा बोजवारा वाजला आहे. शाळा व्यवस्थापन समितीने यासंदर्भात पंचायत समितीस्तरावरील अधिकाऱ्यांना तसेच लोकप्रतिनिधींना ठराव दिला. मात्र नवीन शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
या समस्येची जिल्हा परिषद सदस्य निलकंठ कायते यांनी दखल घेत त्यांनी थेट शाळेला भेट दिली. उपस्थित पालकांशी त्यांनी चर्चा केली. शैक्षणिक नुकसानीमुळे पालकांनी कायते यांना धारेवर धरले. त्यांनी पालकांना मार्गदर्शन करून शाळेच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. लवकरच शाळेत नवीन शिक्षकाची नियुक्ती करण्यात येईल, असे आश्वासन दिले, तसे न झाल्यास पालकांसमवेत आंदोलनासाठी पुढाकार घेणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
दर्जेदार शिक्षण देणे ही शिक्षकांची व मुख्याध्यापकांची जबाबदारी आहे. शिक्षकांनी नवीन आव्हाने स्वीकारून विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते. यासाठी शाळेला दोन शिक्षकांची नितांत गरज आहे. यावेळी सरपंच विजय वासनिक, शाळा व्यवस्थापन समितीचे सुनंदा बोरकर, करूणा बोरकर, पुष्पा बोळणे, हिरना बोरकर, रमा दिनकर, भुपेंद्र रामटेके, भगवान कडव, श्रीराम हारगुळे, राजु मांढरे, संगिता बोरकर आदी उपस्थित होते.
सरपंच विजय वासनिक यांनी शाळेतील समस्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायतीकडून नेहमीच पुढाकार घेतला जातो. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान लक्षात घेता अनेकदा पंचायत समितीला कळविण्यात आले आहे. आता ग्रामसभेचा व शाळा व्यवस्थापन समितीचा ठराव घेवून पुन्हा तो शिक्षण विभागाला पाठविण्यात येईल, असा विश्वास त्यांनी पालकांना दिला.
शाळा शंभरटक्के प्रगत करण्यासाठी पालकांसह ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन सरपंच विजय वासनिक यांनी केले. संचालन सहायक शिक्षीका पुनम राघोर्ते यांनी केले. आभार प्रदर्शन मंगला मस्के यांनी केले. (नगर प्रतिनिधी)
जिल्हा परिषद सदस्यांना घेराव
गडेगाव आगार ते खुटसावरी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यासह अनेक समस्या ग्रामस्थांना भेडसावत आहेत. या समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात, यासाठी खुटसावरीतील नागरिकांनी जिल्हा परिषद सदस्य निलकंठ कायते यांना घेराव घातला. संजय गांधी निराधार योजना यासह अन्य शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळावा,यासाठी नेहमीच धावपळ करीत आहे. ज्यांना समस्या उद्भवतात त्यांनी माझ्याकडे रितसर अर्ज करून मला द्यावे, त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातून समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीन, असे आश्वासन जि.प. सदस्य निलकंठ कायते यांनी ग्रामस्थांना दिला.