शिक्षक, कर्मचारी यांना सॅलरी पॅकेज योजनेंतर्गत मिळणार लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:33 AM2021-02-12T04:33:11+5:302021-02-12T04:33:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : राज्य शासनाच्या सॅलरी पॅकेज योजनेंतर्गत विविध योजनांचा लाभ देण्याची मागणी जिल्हा शालेय शिक्षण कर्मचारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राज्य शासनाच्या सॅलरी पॅकेज योजनेंतर्गत विविध योजनांचा लाभ देण्याची मागणी जिल्हा शालेय शिक्षण कर्मचारी समन्वय समितीच्यावतीने मध्यवर्ती बॅंक प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती. त्या अनुषंगाने जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच बँकेचे व्यवस्थापक व अधिकारी यांच्या उपस्थितीत सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत शिक्षक़ व कर्मचाऱ्यांंना सॅलरी पॅकेज योजनेंतर्गत लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात आले.
या सभेत दर महिन्याच्या १ तारखेला वेतन अदा करणे, शून्य बाकी खाते सुविधा देणे, दैनिक ४० हजारांपर्यंत एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा देणे, २ लाखापर्यंत ओडी सुविधा देणे, ३० लाखांपर्यंत अपघाती विमा व नैसर्गिक मृत्यू विमा योजनेचा लाभ देणे, गृह कर्ज, प्लॉट खरेदी कर्ज, पगार तारण कर्ज, दुचाकी व चारचाकी वाहन कर्ज, घर दुरुस्ती किंवा नूतनीकरण कर्ज व इतर सर्वप्रकारच्या कर्जावर व्याज दर कमी करणे तसेच ऑनलाईन ॲपद्वारे व्यवहाराची सुविधा उपलब्ध करून देणे अशा विविध मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली. शिक्षक, कर्मचारी यांनी केलेल्या मागण्या मंजूर करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे सुनील फुंडे यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले.
दर महिन्याच्या १ तारखेला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या खात्यावर जिल्हा शाखेमधूनच वेतन जमा करण्याबाबत कार्यवाही करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. तसेच शून्य बाकी खाते करण्याबाबतची मागणी सभेत मान्य करण्यात आली. ४० हजारांपर्यंतची रक्कम एटीएममधून काढण्याबाबत १ एप्रिल २०२१पासून सुविधा देण्याचे मान्य करण्यात आले. २ लाखापर्यंत ओडी सुविधा आधीपासूनच बँकेने लागू केली असल्याचे सांगण्यात आले. ऑनलाईन ॲपबाबत बँकेची तयार सुरू आहे परंतु सध्याच्या कोरोना काळात सायबर क्राईम मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने सध्या हे काम स्थगित केलेले असून, पुढील काही काळात सुरक्षित ऑनलाईन ॲपची सुविधादेखील देणार असल्याचे सभेत सांगण्यात आले. तसेच बाकी सर्व मागण्या या धोरणात्मक असल्याने सभेचे इतिवृत्त बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ठेवून मान्यता घेण्यात येईल व आपल्याला कळविण्यात येईल, असे सांगण्यात आले.
यावेळी अपघात विमा व नैसर्गिक मृत्यू विमा ह्या दोन्ही योजनांचा लाभ देण्याबाबत भंडारा जिल्हा शालेय शिक्षण कर्मचारी समन्वय समितीने आग्रही भूमिका मांडली. अपघाती मृत्यू विमा देण्यासाठी बँक तयार असून, नैसर्गिक विम्याकरिता वार्षिक प्रीमियम बँक व कर्मचारी यांनी मिळून भरावा, असे मत अध्यक्षांनी व्यक्त केले. याबाबत विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत समन्वय समितीचे पदाधिकारी व जिल्हा बँकेचे अधिकारी यांनी चर्चा करून येत्या २ ते ३ दिवसात निर्णय घ्यावा, असे सर्वानुमते ठरविण्यात आले.
या सभेत सर्व विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी अध्यक्ष उल्हास फडके, कार्यवाह प्रवीण गजभिये, कार्याध्यक्ष विनोद किंदर्ले, मुख्य मार्गदर्शक अंगेश बेहलपाडे, उपाध्यक्ष जीवन सार्वे, सैंग कोहपरे, सहकार्यवाह सचिन तिरपुडे, सदस्य राजेंद्र दोनाडकर, गंगाधर मुळे, उमेश सिंगनजुडे, उमेश मेश्राम, संजय पाटील, संदीप सेलोकर, पुरी सर, प्रसिध्दीप्रमुख गंगाधर भदाडे तसेच पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. या सभेचे सूत्रसंचालन प्रवीण गजभिये यांनी केले तर जीवन सार्वे यांनी उपस्थितांचे आभार मानले.