शिक्षक संघटना सरसावली
By Admin | Published: April 18, 2015 12:26 AM2015-04-18T00:26:47+5:302015-04-18T00:26:47+5:30
उन्हाळ्याच्या सुट्या म्हटले की शिक्षकांसाठी पर्वणी असते.
'बीएलओ'चे अतिरिक्त काम : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, प्राथमिक शिक्षक संघाचा विरोध
भंडारा : उन्हाळ्याच्या सुट्या म्हटले की शिक्षकांसाठी पर्वणी असते. मात्र, यावर्षी शिक्षकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) ची अतिरिक्त कामे देण्यात आल्याने त्याचा विरोध करण्यासाठी शिक्षक संघटना सरसावल्या आहेत. याविरोधात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांना निवेदन देऊन विरोध करून काम काढून घेण्याची मागणी केली आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या वेळोवेळी निघणाऱ्या अध्यादेशानुसार, राज्यातील सर्व शिक्षक त्यांची अंमलबजावणी व्हावी, यादृष्टिने सर्वोतोपरी कार्य करतात. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ चे कलम २७ आणि त्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी दिलेल्या सुचनानुसार जणगणना, नैसर्गिक आपत्ती व प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया या व्यतिरिक्त अन्य अशैक्षणिक कामे शिक्षकांना देण्यात येत आहे. शासकीय सेवेत असल्याने शिक्षक ही सर्व कामे करीत आहेत. सध्या उन्हाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या परिक्षा अंतिम टप्प्यात आहेत. काही दिवसातच शिक्षकांना उन्हाळी सुट्ट्या लागणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शिक्षकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) ची कामे सोपविण्यात आलेली आहे. त्यामुळे शिक्षकांना उन्हाळ्याच्या सुट्टीचा उपभोग घेता येत नाही. आधिच अनेक शिक्षकांकडे एकापेक्षा अधिक वर्गाची अतिरिक्त जबाबदारी आहे. शिक्षणाच्या व्यतिरिक्त कामे सोपविण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम पडत आहे.बीएलओची जबाबदारी शिक्षकांखेरीज अंगणवाडी वर्कर, पटवारी, अमिन, लेखपाल, व्हिलेज लवेल वर्कर, इलेक्ट्रिक बिल रिडर, पोस्टमन, नर्सेस, हेल्थ वर्कर आदींकडून करून घेणे गरजेचे आहे. असे असतानाही केवळ शिक्षकांना यात गुंतविल्याने त्यांच्यात असंतोष पसरला आहे. त्यामुळे अशा अशैक्षणिक कार्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर परिणाम पडणार असल्याने निवडणूक आयोगाने याची दखल घेऊन शिक्षकांकडे सोपविलेली बीएलओच्या जबाबदरीतून मोकळे करावे, असे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांना शिक्षक संघाने निवेदनातून केली आहे. संघाचे जिल्हाध्यक्ष मुबारक सैय्यद यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले. (शहर प्रतिनिधी)
विवाहामुळे शिक्षकावर धर्मसंकट
बीएलओची कामे ऐन उन्हाळ्याच्या सुट्टीत देण्यात आली आहे. उन्हाळ्यातील सुट्टींचे सर्वांनी नियोजन केलेले असते. याचा फटका एका शिक्षकाला चांगलाच बसला आहे. निवडणूक आयोगाचे स्पष्ट निर्देश असल्याने शिक्षकांकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मात्र, यात मोहाडी तालुक्यातील पुढच्या महिन्यात विवाहाचा मुहुर्त असलेला एक शिक्षक अडकला आहे. त्यामुळे सदर शिक्षकाने मोहाडी तहसीलदारांकडे त्यातून वगळावे, यासाठी अर्ज केला. परंतू तहसीलदारांनी हात वर केल्याने शिक्षकावर विवाहबंधनात अडकण्याऐवजी धर्मसंकटात सापडण्याचा प्रसंग त्यांच्यावर ओढवला आहे.