‘त्या’ शिक्षकांच्या ‘रूजू’ तारखेचा घोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 10:14 PM2018-01-10T22:14:51+5:302018-01-10T22:15:23+5:30
आॅनलाईन लोकमत
भंडारा : आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत भंडारा जिल्हा परिषदमध्ये रूजू झालेल्या शिक्षकांची ‘साडेसाती’ संपलेली नाही. मे महिन्यात कार्यमुक्त होऊन भंडाऱ्यात रूजू झालेल्या शिक्षकांना जिल्हा परिषदने १ जुलै २०१७ पासून रूजू करून घेण्याचे आदेश बजावले. यात तीन महिन्यांचा कालखंड सुटल्याने शिक्षकांची सेवाज्येष्ठतेसह अन्य शासकीय सुविधांपासून वंचित राहण्याचा प्रसंग ओढवला आहे.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मुबारक सैयद, प्राथमिक शिक्षक सहकारी संस्थेचे अध्यक्ष संजीव बावनकर यांच्या नेतृत्वात आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतील शिक्षकांनी बुधवारला मुख्य कार्यपालन अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी यांना निवेदन दिले. या निवेदनात आंतरजिल्हा बदलीद्वारे ९ मे २०१७ नंतर कार्यमुक्त होऊन ११७ शिक्षक भंडारा जिल्हा परिषदमध्ये रूजू झाले. बदली प्रक्रियेतील काही शिक्षकांना भंडारा पंचायत समितीमध्ये रूजू करून घेण्यासाठी टाळाटाळ करण्यात आली. या प्रकरणात काही शिक्षकांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने या शिक्षकांना १ जुलै २०१७ ला रूजू करून घेण्यासंदर्भात आदेश निर्गमीत केले होते.
दरम्यान तीन महिन्यांपर्यंत या शिक्षकांना रूजू करून घेण्यास टाळाटाळ झाल्याने या शिक्षकांची सेवा खंडीत झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
अशा प्रशासकीय बाबीमुळे अधिकारी व शिक्षक यांच्यात रूजू तारखेबाबत संभ्रम आहे. संबंधित शिक्षक ज्या तारखेला कार्यमुक्त होऊन भंडारा येथे रूजू होण्यासाठी आले त्या तारखेपासून शिक्षकांची सेवासातत्य ठेवण्याची मागणी करण्यात आली. यासोबतच त्यांचे मागील दोन महिन्यांचे नियमित वेतन काढून वार्षिक वेतनवाढ मंजूर करावी अशी मागणी करण्यात आली.
शिष्टमंडळात कैलाश बुद्धे, अरविंद बारई, शुद्धोधन बोरकर, निशीकांत बडवाईक, रुपेश झलके, किशोर धरमसहारे, कल्पेश झलके, विशाल गिऱ्हेपुंजे, शामकला भिवगडे, वैशाली बांते, भास्कर हटवार आदींचा समावेश होता.