वृद्धाश्रमात साजरा केला शिक्षक दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:42 AM2021-09-07T04:42:17+5:302021-09-07T04:42:17+5:30

शहापूर : शिक्षक हे देशाची पिढी घडविणारे शिल्पकार असतात. जागरूक समाजाचे आधारस्तंभ म्हणून सर्वत्र शिक्षकांप्रती कृतज्ञता म्हणून ...

Teacher's Day celebrated at the old age home | वृद्धाश्रमात साजरा केला शिक्षक दिन

वृद्धाश्रमात साजरा केला शिक्षक दिन

Next

शहापूर : शिक्षक हे देशाची पिढी घडविणारे शिल्पकार असतात. जागरूक समाजाचे आधारस्तंभ म्हणून सर्वत्र शिक्षकांप्रती कृतज्ञता म्हणून ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून विविध पद्धतीने साजरा केला जातो. या दिवशी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान केला जातो. परंतु या पारंपरिक कल्पनेला छेद देत नानाजी जोशी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शहापूर येथील सर्व ३६ शिक्षकांनी स्वतःचा कोणताही सत्कार करवून न घेता, आपल्यासारख्याच शिक्षकांना जन्म देणाऱ्या आणि शिक्षकांना घडविणाऱ्या, परंतु दुर्दैवाने वृद्धाश्रमात राहणाऱ्या ज्येष्ठ महिलांशी संवाद साधत आणि शिक्षक दिनानिमित्त त्यांचा सत्कार करीत शिक्षक दिन खऱ्या अर्थाने साजरा केला.

भंडारा जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील मानबिंदू समजल्या जाणाऱ्या शहापूर येथील नानाजी जोशी विद्यालयातील शिक्षक हे नेहमीच आपल्या आगळ्या वेगळ्या शैक्षणिक आणि सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या हटके उपक्रमाकरिता परिचित आहेत. त्यामुळे यावर्षीचा शिक्षक दिन शाळेत साजरा न करता आणि स्वतः कोणताही सत्कार न स्वीकारता समाजाला विविध मार्गाने घडविणाऱ्या, दिशा देणाऱ्या, परंतु दुर्दैवाच्या चक्रात अडकून ज्यांना आपले कुटुंब आणि मुलाबाळांना सोडून वृद्धाश्रमात राहावे लागते, अशा निराधार मातांच्या सहवासात साजरा करण्याचे ठरविले. त्यानुसार बेला (भंडारा ) येथील "सिनिअर सिटिझन होम फॉर वुमेन्स" या वृद्धाश्रमात नानाजी जोशी विद्यालयाच्या सर्व शिक्षकांनी वृद्ध मातांना औक्षण करीत गुलाबपुष्प, भेटवस्तू, आणि फराळ देऊन त्यांच्याशी संवाद साधत, हितगुज करीत आणि मनोरंजन करीत सर्व वृद्ध मातांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले.

याप्रसंगी कोविड १९चे सर्व नियम पाळून आयोजित केलेल्या या कार्यक्रमात नानाजी जोशी विद्यालयाचे शिक्षक मनीष मोहरील आणि राजेंद्र बावणे आणि चमू यांनी आपल्या सुरेल स्वरात गाणी गाऊन सर्व वृद्ध मातांना संगीत मेजवानी दिली. यानिमित्ताने नानाजी जोशी विद्यालयाच्या शिक्षकांनी केलेल्या सन्मानाने आणि दिलेल्या आपुलकीने अनेक मातांनी आपल्या भावना व्यक्त करीत असताना सर्वांचे डोळे भरून आले. अत्यंत भावनिक वातावरणात पार पाडलेल्या या कार्यक्रमात सर्व शिक्षकांनी वृद्धाश्रमात असलेल्या आणि एकाकी पडलेल्या वृद्ध मातांशी हितगुज साधत आम्ही सर्व आपल्यासोबत असल्याची जाणीव त्यांना करून दिली.

ज्या आईने जिवाचे रान करून आपल्या मुलांना मोठं केलं. आपल्या पायावर उभे केलं त्या माउलींना आज वृद्धाश्रमात राहावं लागतं हे अत्यंत दुर्दैवी आहे. २१व्या शतकातही अत्यंत पुढारलेल्या समाजाला वृद्धाश्रमाची गरज का पडावी? असा सवालही यानिमित्ताने सर्वांच्या मनात दाटून आला. त्यामुळे सदैव सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न करणाऱ्या नानाजी जोशी विद्यालयातील सर्व शिक्षकांनी आयोजित केलेला आजचा उपक्रम हा शिक्षक दिनाला खऱ्या अर्थाने साजेसा आहे, असे मत याप्रसंगी संस्थेचे संचालक डॉ. रवींद्र वानखेडे, डॉ. ज्योती वानखेडे यांनी व्यक्त केले. डबडबलेल्या डोळ्यांनी आणि निर्मळ मनाने सर्व वृद्ध मातांनी दिलेला आशीर्वाद हाच आम्हा शिक्षकांचा सर्वांत मोठा सत्कार आहे, अशी भावना सर्व शिक्षकांनी याप्रसंगी व्यक्त केली. अध्यक्षस्थानी वृद्धाश्रमाचे संचालक डॉ. रवींद्र वानखेडे हे होते. संचालन मनीष मोहरील यांनी, तर प्रास्ताविक प्रा. डॉ. पितांबर उरकुडे यांनी केले. आभार लोकेश सार्वे यांनी केले. कार्यक्रमासाठी नानाजी जोशी विद्यालयाचे शिक्षक मुन्ना रामटेके, श्रीकांत हरडे, सचिन भुते, प्रा. विनोद भोंगाडे, प्रा. अनिल रंगारी, पद्माकर मेश्राम, अमित ढगे, हेमंत बिसने, वंदना धकाते, खंडाते, चाहनकर, प्रा.श्रीवास्तव, रामटेके, कमाने आणि सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.

Web Title: Teacher's Day celebrated at the old age home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.