शिक्षकदिन विशेष; टीचर्स आर ग्रेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 10:02 AM2020-09-05T10:02:12+5:302020-09-05T10:02:34+5:30
प्राथमिक शिक्षण ते कॉम्पीटीटीव्ह परीक्षेपर्यंत अनेक शिक्षकांचे अमुल्य मार्गदर्शन लाभले. खरोखरचं ‘टीचर्स आर ग्रेट ’ असेच मी म्हणेन.
इंद्रपाल कटकवार
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा: शिक्षक विद्यार्थ्यांतील सुप्त गुण ओळखून मातीच्या गोळ्याला आकार देण्याचे कार्यच करीत असतात. निसर्गाने शिक्षकांना मुक्त हस्ताने विद्यादानाची कला दिली आहे, असे गौरवोद्गार जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी काढले.
बालपणापासूनच पुस्तक वाचण्याची आवड. पण या पुस्तकांपेक्षा त्यातील ज्ञान समजविण्याचे कार्य माझ्या शिक्षकांनीच केले. शैक्षणिक वारसा घरातूनच मिळाला. पूर्वीचे मद्रास शहर म्हणजे आताचे चेन्नई येथून प्राथमिक शिक्षणाला सुरूवात झाली. संगणक-विज्ञान क्षेत्रात अभियंता शाखेची पदवी प्राप्त केली. प्राथमिक शिक्षण ते कॉम्पीटीटीव्ह परीक्षेपर्यंत अनेक शिक्षकांचे अमुल्य मार्गदर्शन लाभले. खरोखरचं ‘टीचर्स आर ग्रेट ’ असेच मी म्हणेन.
आजच्या शिक्षण प्रणालीत आमुलाग्र बदल झालेला आहे. विद्यार्थ्यांना नेहमी सकारात्मक दृष्टीकोन देण्याचे काम शिक्षकच करू शकतात, यात दुमत नाही. गुरूजणांचा आदर होणे अत्यंत गरजेचे आहे असे मत भंडारा जिल्ह्याच्या सीईओ भुवनेश्वरी एस.यांनी व्यक्त केले आहे.
अनेक शिक्षकांचे आभार...
आतापर्यंतच्या प्रवासात अनेक शिक्षकांचे अमुल्य योगदान लाभले आहे. प्राथमिक शिक्षण ते अधिकारी होण्याच्या प्रवासापर्यंत शिक्षकांनी दिलेले बळ अतुलनीय असून या सर्व शिक्षकांचे मी मनापासून आभार मानते. आजही बहुतांश शिक्षक माझ्या आठवणीत असून त्यांच्या संपर्कातही आहे. मी जेव्हा जेव्हा चेन्नईला जाते तेव्हा मी सर्वांची भेट घेण्याचा अवश्य प्रयत्न करते. आई-बाबा व शिक्षकांमुळेच मी इथपर्यंत पोहचू शकली आहे.
स्टेजवर शिक्षक होते म्हणूनच प्रथम आली
माध्यमिक शिक्षण घेत असताना शाळेत राष्ट्रीय भाषण स्पर्धा होती. स्टेजवर जायला खूप अवघड वाटत होते. वर्ग मित्रांनीही हटकले, परंतु स्टेजवर जायची हिंमत होईना. स्टेजवर जाऊन भाषण देण्याची माझी हिंमत नाही, असे मी शिक्षिका एॅण्ड्रयूज मॅरी व फ्रीडा यांना सांगितले. यावेळी त्यांनी दिलेल्या हिमतीच्या बळावर स्पर्धेत मी प्रथम आली.