शिक्षकांची जि.प.वर धडक
By admin | Published: October 7, 2016 12:43 AM2016-10-07T00:43:42+5:302016-10-07T00:43:42+5:30
मागील अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद शिक्षकांच्या समस्या जिल्हा परिषद प्रशासनाने प्रलंबित ठेवल्या आहेत.
शाळा पडल्या ओस : शिक्षकांमध्ये पसरतोय असंतोष
भंडारा : मागील अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद शिक्षकांच्या समस्या जिल्हा परिषद प्रशासनाने प्रलंबित ठेवल्या आहेत. त्या समस्या निकाली काढण्यात यावे, यामागणीसाठी गुरूवारला जिल्ह्यातील सुमारे ४ हजार शिक्षकांनी सामूहिक रजा घेऊन शाळा बंद आंदोलन केले. दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शिक्षकांच्या मागण्यांकडे पाठ दाखविल्यामुळे शिक्षकांमध्ये कमालिचा असंतोष पसरला आहे. मागण्या मान्य होईपर्यंत या शिक्षकांनी उद्यापासून साखळी उपोषण करण्याचा ईशारा दिला आहे.
जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांनी एकत्र येऊन शिक्षक कृती समितीची स्थापना केली. या समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील शिक्षकांनी त्यांचे वेतन महिन्याच्या पहिल्या तारखेला द्यावे, या मागणीसह विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर धरणे आंदोलन करण्याचा इशारा महिनाभरापूर्वी जिल्हा परिषद प्रशासनाला कृती समितीने दिला होता. या आंदोलनासाठी जिल्ह्यातील ७६७ जिल्हा परिषद व ३२ जिल्हा परिषद हायस्कुल शाळेतील शिक्षकांनी एक दिवसाची सामूहिक रजा घेऊन शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सातही तालुक्यातील हजारो शिक्षक सकाळी ११ वाजता जिल्हा परिषदेवर धडकले.
या आंदोलनाचे नेतृत्व रमेश सिंगनजुडे, मुबारक सय्यद, ओमप्रकाश गायधने, धनंजय बिरणवार, वसंत साठवणे, ईश्वर नाकाडे, ईश्वर ढेंगे, युवराज वंजारी, विकास गायधने, केशव बुरडे, राजन सव्वालाखे, दिलीप बावनकर, सुधीर वाघमारे, रजनी करंजेकर, नेपाल तुरकर, संदीप वहिले, सुधाकर ब्राम्हणकर, जी.एस. भोयर, हरिकिसन अंबादे, रमेश पारधीकर, प्रमोद घुमे, मुकुंद ठवकर, महेश गावंडे यांनी केले. दुपारी ३ वाजताच्या सुमारास शिक्षक कृती समितीच्या शिष्टमंडळाला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात चर्चेकरिता बोलाविण्यात आले. यावेळी समितीचे शिष्टमंडळ जिल्हा परिषदेत पोहोचले. सीईओंनी शिक्षकांच्या आंदोलनाला पाठ दाखविल्यामुळे शिक्षकांमध्ये असंतोष पसरला होता. त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर यांच्या कक्षात जाऊन व्यथा मांडल्या. मुख्य कार्यपालन अधिकारी एल.एल. अहिरे यांची प्रतीक्षा करूनही ते न आल्यामुळे आंदोलनकर्ते शिक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. (शहर प्रतिनिधी)
अध्यक्षांनी उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना खडसावले
धरणे आंदोलनात सहभागी हजारो शिक्षकांचे शिष्टमंडळ जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर यांच्याकडे पोहोचले. यावेळी गिलोरकर यांनी सीईओ अहिरे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधूही त्यांना प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे शिक्षकांनी रोष व्यक्त केला. दरम्यान उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर वाळके हे गिलोरकर यांच्या कक्षात आले. यावेळी वाळके यांनी एक दिवसापूर्वी गिलोरकर यांनी सीईओ मुंबईला गेल्याचे खोटे सांगून फसगत केल्याचा रोष व्यक्त केला. वाळके यांना खडेबोल सुनावताना गिलोरकर यांनी सीईओंची पूर्ण माहिती ठेवा, कुणालाही खोटी माहिती देऊ नका, असे सांगून धारेवर धरले. जिल्हा परिषद अध्यक्षांचा संताप बघून सुधीर वाळके यांनी सावरासावर करण्याचा प्रयत्न केला.
सीईओंची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
४शिक्षकांनी न्याय्य हक्कासाठी धरणे आंदोलन केले. त्यांच्या मागण्यांची पुर्तता करण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी एल.एल. अहिरे यांची होती. मात्र आंदोलनाला पाठ दाखविली. दरम्यान याबाबत जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर यांनी त्यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. यामुळे शिक्षकांमध्ये असंतोष पसरला. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली. सोबतच उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) यांच्या वागणुकीमुळे कृती समितीमध्ये असंतोष पसरला असून शिक्षकांना न्याय द्यावा, अशी तक्रार जि.प.अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर यांनी जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांकडे केली आहे.