प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकांचा आंदोलनाचा इशारा
By admin | Published: January 23, 2017 12:25 AM2017-01-23T00:25:50+5:302017-01-23T00:25:50+5:30
जिल्हा परिषद शिक्षकांच्या प्रलंबित समस्या निकाली निघालेल्या नाहीत. चार महिन्यापूर्वी यासाठी आंदोलन करण्यात आले होते.
शिक्षक कृती समितीचा ठराव : जिल्हा परिषद प्रशासनाला दिला ७ फेब्रुवारीपर्यंत अल्टीमेटम
भंडारा : जिल्हा परिषद शिक्षकांच्या प्रलंबित समस्या निकाली निघालेल्या नाहीत. चार महिन्यापूर्वी यासाठी आंदोलन करण्यात आले होते. मात्र आश्वासनापलिकडे काहीच मिळाले नाही. त्यामुळे ७ फेब्रुवारीपर्यंत प्रलंबित समस्या निकाली काढाव्या, अन्यथा ९ फेब्रुवारीपासून जिल्ह्यातील सर्व शिक्षक काम बंद आंदोलन करतील असा इशारा आज झालेल्या शिक्षक कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या ठरावातून देण्यात आला आहे.
जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या एक ना अनेक समस्या शासनस्तरावर प्रलंबित आहेत. याकरिता मागील अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद शिक्षकांनी आंदोलन, मोर्चे व निदर्शने करून त्यांच् या समस्या सोडविण्याची विनवणी प्रशासनाला केली. मात्र त्यांच्या समस्यांकडे कुणीही लक्ष देत नसल्याने चार महिन्यापूर्वी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी काम बंद आंदोलन करून प्रशासनाला हादरवून सोडले. त्यांच्या समस्यांचे निवेदन देण्याकरिता जिल्हा परिषद प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी आंदोलनस्थळी आले नाही किंवा त्यांना भेटण्यासाठी वेळही दिली नव्हती. त्यामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये जिल्हा परिषद प्रशासनाविरुद्ध असंतोष उफाळला होता. दरम्यान त्यांनी मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला होता. यामुळे जिल्हा परिषद शाळा बंद पडण्याची भीती निर्माण झाल्याने खासदार नाना पटोले, आमदार चरण वाघमारे यांच्या पुढाकाराने मुख्य कार्यकारी अधिकारी अहिरे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र त्यानंतर त्यांच्या आश्वासनांची पूर्तता अद्यापही झोली नाही. चार महिन्यांचा कालावधी लोटला असून या मागण्या ७ फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषद प्रशासनाने निकाली काढून शिक्षकांना न्याय द्यावा अशी मागणी शिक्षक कृती समितीने केली आहे. याकरिता शिक्षक कृती समितीचे आज दुपारी शिक्षक पतसंस्थेच्या सभागृहात सभा घेण्यात आली. यात मागण्या मान्य न झाल्यास ९ फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन करण्याचा ठराव पारित करण्यात आला. यामुळे पुन्हा एकदा जिल्हा परिषद प्रशासन व जिल्हा परिषद शिक्षक आमोरे सामोरे उभे ठाकणार आहेत. या सभेला कृती समितीचे अध्यक्ष मुबारक सय्यद, रमेश सिंगनजुडे, ओमप्रकाश गायधने, धनंजय बिरणवार, ईश्वर नाकाडे, ईश्वर ढेंगे, युवराज वंजारी या शिक्षक नेत्यांसह अनेक शिक्षकांची प्रामुख्याने उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)