शिक्षकांनी स्वत:च्या क्षमतेवर विश्वास ठेवावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 10:29 PM2018-02-12T22:29:23+5:302018-02-12T22:29:44+5:30
जिल्हा प्रशासनाने सुरु केलेला सक्षम हा उपक्रम शिक्षकांसाठी अनिवार्य नसून ऐच्छिक आहे. स्वत:मध्ये बदल करण्यासाठी तसेच चौकटीबाहेर पडण्यासाठी सक्षम हा उत्तम मार्ग आहे.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : जिल्हा प्रशासनाने सुरु केलेला सक्षम हा उपक्रम शिक्षकांसाठी अनिवार्य नसून ऐच्छिक आहे. स्वत:मध्ये बदल करण्यासाठी तसेच चौकटीबाहेर पडण्यासाठी सक्षम हा उत्तम मार्ग आहे. शालेय शिक्षणासोबतच कौशल्य व मुल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी सक्षम हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. स्वत:मधील शक्ती व क्षमता ओळखण्यासाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. स्वत:लाच प्रोत्साहित करणे हे एक आव्हान असतं. शिक्षकांनी हे आव्हान पेलून स्वत:च्या क्षमतेवर विश्वास ठेवावा व आपल्या नाविण्यपूर्ण संकल्पनेतून विद्यार्थी घडवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले.
सक्षम उपक्रमांतर्गत जिल्हयातील ३०० निवडक शिक्षकांचे चार दिवसीय प्रशिक्षणास आजपासून हेमंत सेलिब्रेशन येथे सुरुवात झाली आहे. फिनलँड येथील कौन्सिल फॉर क्रिएटिव्ह एज्युकेशन या संस्थेचे प्रमुख हेरंब कुलकर्णी यांच्या नेतृत्वात हे प्रशिक्षण देण्यात येत आहे.
या प्रशिक्षणाच्या उदघाटन प्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, मनिषा दांडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर आडे व सक्षमची टिम यावेळी उपस्थित होती.प्रचलित शिक्षण पध्दतीसोबतच मुल्य व कौशल्य आत्मसात करणे काळाची गरज आहे. यावर आधारित उपक्रम जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे.
सक्षम हा उपक्रम सरकारी नसून तो शिक्षकांनी शिक्षकांसाठी स्वच्छेने तयार केला आहे. त्यामुळे तो अनिवार्य नसून ऐच्छिक आहे, असे जिल्हाधिकारी म्हणाले. ज्या शिक्षकांना चौकटीबाहेर पडून काहीतरी नाविण्यपूर्ण करण्याची इच्छा आहे. त्यांचे सक्षममध्ये स्वागत आहे. तोच तोच अभ्यास त्याच त्याच पध्दतीने केल्यामुळे अनेकवेळा अपयश प्राप्त होते. हा संशोधकाचा निष्कर्ष आहे. ही पध्दती शिक्षकांनी आत्मसात करावी, अशी अपेक्षा जिल्हाधिकाºयांनी व्यक्त केली. फिनलँड येथील कौन्सिल फॉर क्रिएटिव्ह एज्युकेशन या संस्थेचे प्रमुख हेरंब कुलकर्णी यांनी विविध देशांच्या शिक्षण पध्दतीचा अभ्यास करुन काही तंत्र विकसित केले आहे. त्यावर आधारित हे प्रशिक्षण आहे. कुलकर्णी म्हणाले की, कौशल्य व मुल्यांचा संबंध हा मुळ अभ्यासक्रमाशीच आहे. अभ्यासाव्यतिरिक्त काही नसून गुणवत्तापूर्ण विकास मात्र वेगळया पध्दतीने म्हणजेच सक्षम असे ते म्हणाले. फिनलँड हा देश शिक्षणाच्या बाबतीत अग्रेसर आहे असे सांगून कुलकर्णी म्हणाले की, क्लासरुम एन्व्हायर्मेट, मुलांमध्ये विषयाबद्दल उत्सुकता निर्माण करणे, मुलांच्या मनातील भिती दूर करणे व मुक्त वातावरणातील शिक्षण यामुळेच शैक्षणिक प्रगती शक्य आहे.
चार दिवसीय प्रशिक्षणात शिक्षकांना विविध विषयावरील चित्रफित दाखविण्यात येणार आहे. जगातील अनेक देशात कशा प्रकारे शिक्षण दिल्या जाते. याबाबतची माहिती व त्यासाठी लागणारी तयारी आदी बाबत शिक्षकांना या प्रशिक्षणात माहिती देण्यात येईल.