५०० विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांचे लेखणीबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2016 12:35 AM2016-02-03T00:35:50+5:302016-02-03T00:35:50+5:30
सितासावंगी येथील तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राध्यापकांचे वेतन होत नसल्याने प्राध्यापकांनी संप पुकारला.
आंदोलन सुरुच : प्राचार्य व लिपिकाविरोधात पोलिसात तक्रार
तुमसर : सितासावंगी येथील तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राध्यापकांचे वेतन होत नसल्याने प्राध्यापकांनी संप पुकारला. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने प्राध्यापक व सुमारे ५०० विद्यार्थ्यांनी प्राचार्यांच्या विरोधात दंड थोपटले आहे.
वस्तीगृहातील काही विद्यार्थ्यांनी जीवाला धोका असल्याची तक्रार गांबरवाही पोलीस ठाण्यात नोंदविली. दरम्यान चौकशीकरिता तंत्रशिक्षण मंडळ नागपूर तथा तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय नागपूर येथील समिती येऊन गेली.
१९८४ मध्ये सितासावंगी येथे विवेकानंद पॉलिटेक्निक सुरू झाले. या महाविद्यालयात बिहार, झारखंड, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशातील विद्यार्थी शिकत आहेत. येथील प्राध्यापकांचे मागील तीन ते चार महिन्यांपासून वेतन झाले नाही. वेतनाच्या मागणीसाठी प्राध्यापक २६ जानेवारीपासून महाविद्यालयाच्या बाहेर आंदोलन करीत आहेत. त्यांच्या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी प्राचार्य रणविरसिंग रोटीया यांची भेट घेतली.
प्राध्यापकांच्या संपावर तोडगा काढून कॉलेज पूर्ववत सुरू करण्याची मागणी त्यांनी केली. प्राचार्य रोटीया यांनी तोडगा काढण्याऐवजी विद्यार्थ्यांना अपमानास्पद वागणुक दिल्याचा आरोप विद्यार्थ्यांचा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्राचार्य रोटीया यांच्या विरोधात विद्यार्थ्यांनीही प्राध्यापकांसोबत आंदोलन पुकारले आहे. प्राध्यापक वेतनासाठी तर विद्यार्थी प्राचार्याला हटविण्यासाठी येथे आंदोलन करीत आहेत. अजूनपर्यंत येथे तोडगा निघाला नाही. आंदोलनामुळे विद्यार्थ्यांच्या प्रात्याक्षिक परीक्षा रखडल्या आहेत. संस्था प्राचार्याच्या बचावाकरिता सरसावली आहे. संस्थेने सन २००८ मध्ये महाराष्ट्र तांत्रिक शिक्षण विभागाच्या संचालकांना पाठविले होते. पंरतु त्यावरही कारवाई झाली नाही. दरम्यान, तुमसरचे आमदार चरण वाघमारे यांनी भेट देऊन चर्चा केली परंतु आंदोलनावर तोडगा निघाला नाही. सितासावंगी येथे १७ एकर जागेत कॉलेज आहे. काही जागा ही झुडपी जंगलातही मोडते. प्रथम कॉलेज इमारत मॉईलने बांधली होती. येथे मॉईल कामगारांनी एक दिवसाचा पगार दिला होता, हे विशेष. सध्या मॉईलने येथे हात वर केल्याचे समजते. या कॉलेजमध्ये सहा अभियांत्रिकीच्या शाखा आहेत. त्यात ५०० विद्यार्थी शिकत आहेत. येथे ८६ कर्मचारी कार्यरत आहेत. (तालुका प्रतिनिधी)
प्राचार्यांची चौकशी
प्राचार्य रणवीरसिंग रोटीया यांची चौकशी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, विभागीय कार्यालय नागपूरतर्फे २३ सप्टेंबर २०१३ ला करण्यात आली. चौकशीत प्राचार्य रोटीया हे बीएससी व एमएससी आहेत. त्यांची नियुक्ती संस्थेने १९८६ ला अधिव्याख्याता पदावर केली होती. नंतर त्यांनाच प्राचार्य म्हणून पदभार दिला. या संस्थेच्या प्राचार्याची अर्हता एआयसीटीईच्या मानकानुसार नाही असा अहवाल दिला होता, हे विशेष.