नामवंत महाविद्यालयाच्या धर्तीवर शिक्षण देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2017 12:23 AM2017-06-16T00:23:51+5:302017-06-16T00:23:51+5:30
मोठमोठ्या शहराप्रमाणे महाविद्यालयाच्या भव्य इमारती, भव्य पटांगण, सुखसोयी, उत्कृष्ट शिक्षण व त्याच बरोबर नोकरीची संधी
शैक्षणिक क्रांती : माधव पिंजारकर यांचे प्रतिपादन
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : मोठमोठ्या शहराप्रमाणे महाविद्यालयाच्या भव्य इमारती, भव्य पटांगण, सुखसोयी, उत्कृष्ट शिक्षण व त्याच बरोबर नोकरीची संधी ही तुमसर सारख्या छोट्याशा शहरात व ते कमी खर्चात सहज उपलब्ध होत असेल तर या क्षेत्रात शैक्षणिक क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन संस्था अध्यक्ष माधव पिंजारकर यांनी केले आहे.
शहरालगतच्या खैरलांजी येथे नव्याने सुरू झालेल्या अंजनेय पॉलिटेक्निक येथील मुख्याध्यापकांच्या शिबिरात ते बोलत होते. यावेळी मंचावर शेख गुलाम हैदर, सचिव आशिष काचरे, सुनील चौधरी, अतुल गौर, कृणाल बिसेन, निखिल तराणे उपस्थित होते.
पिंजारकर म्हणाले, तुमसर तालुक्यात मोठे उद्योग वा कोणतेही रोजगार उपलब्ध नाही. तालुक्याची आर्थिक स्थिती ही शेतीवरच अवलंबून आहे. प्रत्येक पालकाला वाटते की आपल्या लेकराने उच्च शिक्षण घ्यावे, चांगली नोकरी लागावी. मात्र उच्च शिक्षणाला लागणारा खर्च पाहता अनेक होतकरू, हुशार विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत होते. परंतु आता ती वेळ येणार नाही शैक्षणिक क्रांती घडविण्याच्या उद्देशाने चेतना बहुउद्देशिय शिक्षण संस्थेने ए.आय. सी.टी.ई. व डीटीईच्या मुल्यांकनानुसार इमारत, शैक्षणिक साहित्य, उत्कृष्ट शिक्षक नियुक्त केले आहेत.
मोठ्या शहरातील नामवंत महाविद्यालयाच्या धर्तीवर शिक्षण दिले जाणार आहे. त्याच बरोबर महाविद्यालयाने १५ मोठ्या कंपनीशी "टायअप" करून घेतल्याने विद्यालयीन विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना व पालकांना योग्य मार्गदर्शन करून तंत्रशिक्षणाचे व महाविद्यालयाचे महत्व समजवून सांगण्याचे आवाहन केले. याप्रसंगी तालुक्यातील ४० मुख्याध्यापक शिबिरात सहभागी झाले होते.
यावेळी मुख्याध्यापकांना अभ्यासक्रमाला लागणारे साहित्य, "टायअप" कंपन्या आदीविषयी माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन राजाराम मते यांनी केले.