विद्यार्थ्यांना शिकविणे म्हणजे शेती पिकविणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2016 12:34 AM2016-03-29T00:34:20+5:302016-03-29T00:34:20+5:30
आज घराघरात शिक्षण हे महत्वाचे आहे. जो शिकला तो टिकला. विद्यार्थ्यांचे आई-वडील समजून विद्यार्थ्यांना शिक्षकांनी योग्य ज्ञानाचे धडे शिकवावे.
रामचंद्र अवसरे यांचे प्रतिपादन : शैक्षणिक साहित्य प्रदर्शनी
जवाहरनगर : आज घराघरात शिक्षण हे महत्वाचे आहे. जो शिकला तो टिकला. विद्यार्थ्यांचे आई-वडील समजून विद्यार्थ्यांना शिक्षकांनी योग्य ज्ञानाचे धडे शिकवावे. जसे पिकांना खत पाणी देऊन लहानाच मोठा करतो, त्याचप्रकारे ज्ञानरुपी खतपाणी विद्यार्थ्यांच्या मनात रुजवून सुसंस्कारीत बनविणे म्हणजे शेती पिकविणे होय, असे प्रतिपादन आमदार रामचंद्र अवसरे यांनी केले.
जिल्हा परिषद शाळा केंद्र ठाणाद्वारे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम ज्ञानरचनावाद तंत्रस्नेही शाळा शिक्षणाची वारी अंतर्गत शिक्षणाचा प्रचार व प्रसार होण्याच्या दृष्टीने गावची शाळा आमची शाळा या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळा पेवठा येथे शैक्षणिक साहित्य प्रदर्शनी व पालखीचे समारोपप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष राजेश डोंगरे हे होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रेमदास वनवे, चंद्रप्रकाश दुरुगकर, के. झेड. शेंडे, देवराव पडोळे, एस. एच. तिडके, अमित वसाणी,चोलाराम गायधने, सुरेश मेश्राम, निलकंठ हटवार, कविता पाटील, रविंद्र मेश्राम केंद्र प्रमुख वसंत साठवणे उपस्थित होते.
राजेश डोंगरे म्हणाले, आज बोटावर मोजण्याइतकेच शिक्षक आदर्श ठरत आहे. शिक्षक भ्रष्ट व्यभीचारी झाला तर विकासाचे मार्ग खुंटतो. मराठी शाळांना शैक्षणिक वारी काढण्याची वेळ येऊन ठेपली आहे. याची कारणमिमांसा करावे. विद्यार्थी-पालक -शिक्षक यांची योग्य सांगळ असली तर, सामाजिक शैक्षणिक उत्थान होऊ शकतो. याकरिता शिक्षण हेच प्रबोधनाचे योग्य साधन आहे.
तत्पूर्वी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखली या ठिकाणाहुन बारा गावादरम्यान काढण्यात आलेल्या शिक्षणाची वारीचे जिल्हापरिषद शाळा पेवठा येथे सभेत रुपांतर झाले. उपस्थित पाहुण्यांनी जिल्हा परिषद शाळा राजेदहेगाव व खराशी येथील शिक्षिका आमना सयैद व आशा लाहाणे यांनी तयार केलेल्या शैक्षणिक साहित्याची प्रत्यक्ष पाहणी करीत चर्चा केली. असर फाऊंडेशन कला संस्कृती कलापथकद्वारे कार्यक्रम सादर करण्यात आले. सायंकाळी सरगम ग्रुपद्वारे 'आज की शाम आपके नाम' या सदराखाली संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. संचालन मुकेश लामकाने यांनी केले. आभार अशोक भुरे यांनी मानले. (वार्ताहर)