टेक एक्स्पोचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 10:30 PM2018-02-26T22:30:58+5:302018-02-26T22:30:58+5:30
छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे भंडारा पोलीस विभागाच्या वतीने टेक्स एक्स्पो २०१८ या कार्यक्रमाचे समारोप करण्यात आले.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे भंडारा पोलीस विभागाच्या वतीने टेक्स एक्स्पो २०१८ या कार्यक्रमाचे समारोप करण्यात आले.
कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक विनिता साहू, अपर पोलीस अधीक्षक रश्मि नांदेडकर, पोलीस उपअधिक्षक गृह कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत डिसले उपस्थित होते. यावेळी विनिता साहू यांनी, सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच शाळकरी व महाविद्यालयीन मुले, महिला व बाल विकास अधिकारी, विधी सेवा प्राधिकरण, फॉरेन्सीक सायन्स या सर्वांनी अगदी कमी वेळात चांगली मेहनत घेवून कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मोलाची भूमिका पार पाडली आहे. आमचा जो उद्देश होता तो परिपूर्ण झालेला आहे. तसेच पोलिसांची कामगिरी व भूमिकेबद्दल माहिती सांगितली. पोलिसांबद्दलचे गैरसमज दूर व्हावे, मनातील भिती जावी, हा या मागचा उद्देश आहे. समाजात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये याकरिता पोलीस कार्य करतात. चारही विभागांतर्गत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये फिरते पोलीस स्टेशन घेण्यात येत आहे. मुलामुलीचे घरातून पळून जावून लग्न करण्याचे प्रमाण वाढलेले आहे. मुले मुलींना पळवून नेतात. त्यामुळे त्यांचे विरूद्ध अपराधाचे गुन्हे दाखल होवून त्यांचे उज्वल भविष्य धोक्यात येते, याबाबत माहिती दिली.
समारोप कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय, भंडारा यांना प्रथम पारितोषिक, प्रिव्हीयन्स फॉरेन्सिक टेक्नालॉजी, नागपूर यांना द्वितीय पारितोषिक आणि फॉरेन्सीक इन्स्टीट्यूट कॉलेज नागपूर यांना तृतीय पारितोषिक देण्यात आले. त्याचप्रमाणे भंडारा पोलीस विभागातील फिरते पोलीस स्टेशनला प्रथम पारितोषिक, आॅनलाईन तक्रार सुविधा यांना द्वितीय पोरितोषिक आणि अॅन्टी नक्षल सेल यांना तृतीय पारितोषिक देवून गौरविण्यात आले.