६९ कोटींच्या पाणी पुरवठा योजनेला तांत्रिक मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 11:05 PM2018-03-31T23:05:47+5:302018-03-31T23:05:47+5:30
बारमाही वैनगंगा नदीच्या काठावर वसलेल्या भंडारा शहरात इंग्रजकालीन पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन जीर्ण झाल्यामुळे शहरात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : बारमाही वैनगंगा नदीच्या काठावर वसलेल्या भंडारा शहरात इंग्रजकालीन पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन जीर्ण झाल्यामुळे शहरात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. आता महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत ६९ कोटी ५५ लाख ९२ हजार रूपयांची पाणी पुरवठा योजनेच्या प्रारूपाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने तांत्रिक मंजुरी दिली आहे. आता नगर परिषदेने प्रशासकीय मान्यतेसाठी सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे. त्यामुळे पुढच्यावर्षी शहरवासियांना नियमित पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे.
असा आहे मंजुरी आदेश
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता वी.बी. जगतारे यांनी जारी केलेल्या तांत्रिक मंजुरी आदेशानुसार ६९ कोटी ५५ लाख ९२ हजार रूपयांची पाणी पुरवठा योजना सुरू करण्यापूर्वी जलकुंभाची जागा निश्चित करणे गरजेचे असून भूसंपादन केल्यानंतर कामांना प्रारंभ होईल.
शहराला मिळणार पाणी
सद्यस्थितीत पाणी पुरवठा योजनेची क्षमता ९ एमएलटी इतकी असून जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून हुतात्मा स्मारक व कारागृह परिसरातील दोन जलकुंभातून शहरात पाणी पुरवठा होतो. आता प्रस्तावित योजनेची क्षमता २५ एमएलटी राहणार असून नवीन पाईपलाईन टाकण्यात येईल. शहराचे सहा झोनमध्ये वर्गिकरण करून आणखी चार जलकुंभ बनविण्यात येणार आहेत. हुतात्मा स्मारक परिसरात ५.९० लाख लिटर, भय्याजी नगरात ७.५० लाख लिटर, एमएसईबी कॉलनीत ४.५ लाख लिटर आणि पटवारी भवन परिसरात १२.२० लाख लिटर क्षमतेचे जलकुंभ बनविण्याची योजना असून ही योजना अडीच वर्षात पूर्ण होईल.
पाणी पुरवठा होता ज्वलंत मुद्दा
वैनगंगा नदी काठावर भंडारा शहर वसले असले तरी पाणी टंचाईचा मुद्दा गंभीर बनला होता. पाणी पुरवठ्याच्या नावावर आजवर कोट्यवधीचा निधी खर्च करण्यात येत होता. भूमिगत चेतन बंधारा बांधकामासाठी कर्ज घेण्यात आले होते. त्यानंतरही पाणी टंचाईचा प्रश्न मिटला नाही. सन २०११ मध्ये पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव मंजूर झाला. परंतु काम समोर सरकले नाही. सन २०१७ मध्ये नगर परिषद निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाणी पुरवठा योजना मंजूर करण्याचे आश्वासन दिले होते. फेब्रुवारी महिन्यात नगर परिषदेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी समारोहात आले असता त्यांनी पाणी पुरवठा योजनेच्या मंजुरीची घोषणा केली. तांत्रिक मंजुरी मिळाली आता प्रशासकीय मंजुरीची प्रतिक्षा आहे.
प्रशासकीय मान्यतेची प्रतीक्षा
तांत्रिक मंजुरी मिळाल्यानंतर नगर परिषदेकडून प्रशासकिय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. एप्रिल महिन्यात प्रशासकिय मान्यता मिळताच कामाला प्रारंभ होण्याची शक्यता आहे. वैनगंगा नदीत नाग नदीचे प्रदूषित पाणी येत असून ही समस्या मार्गी लावण्यासाठी ओझोन प्लांटचा प्रस्ताव टाकण्यात येणार आहे.
भंडारा शहरात पाणी पुरवठा योजनेसाठी आमदार डॉ.परिणय फुके, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वारंवार पाठपुरावा केल्यामुळे ही योजना मंजूर होऊ शकली. आता लवकरच प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. भंडारा शहराच्या विकासासाठी कटीबद्ध असून प्रत्येक घरी पिण्याचे शुद्ध पाणी मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
- सुनिल मेंढे,
नगराध्यक्ष भंडारा.