आयएएस असलेल्या तहसीलदारांचे केबिन सर्वसामान्यांसाठी खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:42 AM2021-02-05T08:42:53+5:302021-02-05T08:42:53+5:30

मोहाडी : साधारणतः कोणत्याही कार्यालयातील प्रमुख अधिकाऱ्याच्या केबिनचे दार नेहमी बंद असते किंवा ‘परवानगीशिवाय आत येऊ नये’ असा फलक ...

Tehsildar cabins with IAS open to the public | आयएएस असलेल्या तहसीलदारांचे केबिन सर्वसामान्यांसाठी खुले

आयएएस असलेल्या तहसीलदारांचे केबिन सर्वसामान्यांसाठी खुले

Next

मोहाडी : साधारणतः कोणत्याही कार्यालयातील प्रमुख अधिकाऱ्याच्या केबिनचे दार नेहमी बंद असते किंवा ‘परवानगीशिवाय आत येऊ नये’ असा फलक लागल्याचे पाहण्यात येते. मात्र, आयएएस असलेल्या महिला अधिकारी येथे एका महिन्यासाठी तहसीलदार म्हणून रूजू झाल्या आणि त्यांनी अधिकाऱ्यांच्या त्या परंपरेला फाटा देत महिनाभर त्यांच्या केबिनचे दार खुले ठेवले. एवढेच नाही तर केबिनबाहेर आपला मोबाईल क्रमांकसुद्धा लिहून नवा किर्तीमान स्थापन केला.

आयएएसची अंतिम परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर या अधिकाऱ्यांना प्रत्येक विभागाचा अनुभव घेण्यासाठी विभागप्रमुख म्हणून एक किंवा दोन महिन्यांसाठी नियुक्त केले जाते. त्यामुळे आयएएस असलेल्या मीनल करणवाल यांना मोहाडी येथे सर्वप्रथम गटविकास अधिकारी पंचायत समिती मोहाडी येथे एक महिना व नंतर तहसीलदार म्हणून तहसील कार्यालय मोहाडी येथे एका महिन्यासाठी नियुक्त करण्यात आले होते. देहराडून उत्तराखंड येथील सर्वसामान्य परिवारातून आलेल्या व सर्वसामान्य व्यक्तीची जाणीव असलेल्या या आयएएस महिला अधिकाऱ्यांनी सर्वप्रथम तहसील कार्यालयात कामकाजाची एक वेगळी शिस्त लावली. एरव्ही कोणत्याही वेळी पानटपरीवर दिसणारे कर्मचारी यामुळे दिवसभर आपल्या टेबलवर काम करताना दिसायचे. साधारणतः सामान्य व गरीबवर्गातून येणारे नागरिक सहसा आपली समस्या घेऊन अधिकाऱ्यांपर्यंत जाण्यासाठी धजावत नाहीत किंवा शिपाई त्यांना आत जाऊ देत नाही, ही वस्तुस्थिती आहे. यासाठी तहसीलदार मीनल करनवाल यांनी आपल्या केबिनचे दार नेहमी खुले ठेवण्याचा आदेश दिला. त्यांच्या काळात कोणीही आपल्या समस्या घेऊन त्यांच्याकडे जाऊ शकत होता. एवढेच नाही तर कोणीही, केव्हाही कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्याबाबत काही तक्रारी असल्यास किंवा समस्या असल्यास माझ्याशी संपर्क करावा, असा फलक केबिन बाहेर लावून आपला मोबाईल क्रमांकसुद्धा दिला होता. त्यांच्या केबिनचे दार नेहमी खुले ठेवणे व महिला असूनसुद्धा सर्वांसाठी मोबाईल क्रमांक केबिनबाहेर लिहून ठेवण्याच्या या वेगळ्या भूमिकेमुळे त्यांनी तालुक्यातील जनतेचे मन जिंकले. २९ जानेवारीला त्यांचा एक महिन्याचा येथील कार्यकाळ संपला. त्या भंडारा येथे उपविभागीय अधिकारी म्हणून एक फेब्रुवारीला रूजू होणार आहेत. त्यामुळे तहसील कार्यालयातर्फे त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. मात्र, येथील जनतेच्या मनात त्यांचा एक महिन्याचा कार्यकाळ सदैव स्मरणात राहील, हे विशेष.

कोट

"सामान्य नागरिक मोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत आपल्या समस्या घेऊन पोहोचू शकत नाहीत. याची मला जाणीव असल्यानेच मी असे निर्णय घेतले. भविष्यातसुद्धा माझी हीच भूमिका राहील.

मीनल करणवाल, आयएएस

Web Title: Tehsildar cabins with IAS open to the public

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.