पळा पळा तहसीलदार आले... म्हणत रेती तस्कर झाले सैरभैर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2022 05:00 AM2022-06-04T05:00:00+5:302022-06-04T05:00:48+5:30
भंडारा जिल्ह्यात रेती तस्करीचा विषय अनेक वर्षांपासून गाजत आहे. महिनाभरापूर्वी उपविभागीय अधिकाऱ्यांवर तस्करांनी हल्ला केला. संपूर्ण महसूल प्रशासन ॲक्शन माेडवर आले. खुद्द जिल्हाधिकारी आणि पाेलीस अधीक्षकांनी भंडारा तालुक्यातील वडेगाव घाटावर रात्री धाड घालून रेती तस्करांवर कारवाई केली. आता त्याच घाटावर काल रात्री पळा पळा तहसीलदार आले, असा प्रसंग अनुभवास आला. भंडाराचे तहसीलदार अरविंद हिंगे यांनी रेती तस्करांच्या मुसक्या आवळणे सुरू केले आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : तहसीलदारांचे रेतीघाटाकडे येणारे शासकीय वाहन पाहताच रेती तस्कर सैरभैर झाले. नदीपात्रातील आपली वाहने पळवून नेण्यासाठी तस्करांनी दुचाकीने घाटाकडे धाव घेतली. मांडणगाव, खमारी, बेलगाव येथील सुमारे शंभर ते दीडशे तस्करांनी तहसीलदारांचे वाहन पाेहोचण्यापूर्वी सर्व ट्रॅक्टर नदीघाटातून रफादफा केले. हा प्रकार वैनगंगा नदीतीरावरील भंडारा तालुक्यातील बेलगाव येथील वडेगाव रिठी घाटावर गुरुवारी रात्री ८ वाजता घडला.
भंडारा जिल्ह्यात रेती तस्करीचा विषय अनेक वर्षांपासून गाजत आहे. महिनाभरापूर्वी उपविभागीय अधिकाऱ्यांवर तस्करांनी हल्ला केला. संपूर्ण महसूल प्रशासन ॲक्शन माेडवर आले. खुद्द जिल्हाधिकारी आणि पाेलीस अधीक्षकांनी भंडारा तालुक्यातील वडेगाव घाटावर रात्री धाड घालून रेती तस्करांवर कारवाई केली. आता त्याच घाटावर काल रात्री पळा पळा तहसीलदार आले, असा प्रसंग अनुभवास आला.
भंडाराचे तहसीलदार अरविंद हिंगे यांनी रेती तस्करांच्या मुसक्या आवळणे सुरू केले आहे. रात्री-बेरात्री घाटावर धाडी टाकून कारवाई केली जात आहे. त्यामुळे त्यांची रेती तस्करात चांगलीच धास्ती आहे. गुरुवारी रात्री ८ वाजता तहसीलदारांचे शासकीय वाहन बेलगाव येथील वडेगाव रिठी घाटावर कारवाईसाठी निघाले. नेहमीप्रमाणे तस्करांना या वाहनाची कुणकुण लागली. तहसीलदार आपल्याला साेडणार नाही, ट्रॅक्टर जप्त करतील, अशी धास्ती घेत रेती तस्करांनी घाटाकडे धाव घेतली. ३० ते ३५ दुचाकीवरून मांडणगाव, खमारी, बेलगाव येथे तस्कर घाटाकडे निघाले. नदीपात्रात उत्खनन करीत असलेल्या वाहन चालकांना सूचना देत तात्काळ सर्वांनी तेथून पळ काढला. त्यामुळे काेणत्याही कारवाई झाली नाही.
रेतीची दुकाने रस्त्यावर
- नदीपात्रातून रेती उपसून साठा रस्त्यावर केला जाताे. भंडारा तालुक्यातील भिलेवाडा ते खडकी रस्त्यावर सात ते आठ ठिकाणी अशी रेतीची दुकाने लागली आहेत. रात्री ट्रॅक्टरद्वारे उपसा आणि दिवसा मागणीप्रमाणे भंडारा शहरात टिप्पर ट्रॅक्टरने रेतीचा पुरवठा, असा प्रकार गत अनेक दिवसापासून सुरू आहे.
पावसाळा जवळ आल्याने साठेबाजी
- पावसाळा जवळ आल्याने शक्य तितकी रेती नदीपात्रातून उपसून त्याचा साठा करण्याची चढाओढ रेती तस्करांमध्ये लागली आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील बहुतांश नदीतीरावर माेठाले ढीग दिसत आहे.
भंडारा तालुक्यात रेती तस्करांविरुद्ध माेहीम उघडण्यात आली आहे. रेती तस्करांचा बीमाेड करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात धाडसत्र राबविले जात आहे. नागरिकांनी रेती तस्करी हाेत असल्यास माहिती द्यावी.
-अरविंद हिंगे,
तहसीलदार भंडारा