हल्ला करणाऱ्या रेती तस्कारांपासून बचावासाठी तहसीलदांनी केला हवेत गोळीबार, जेसीबी चालकाला अटक, दोघांवर गुन्हा
By ज्ञानेश्वर मुंदे | Published: November 3, 2022 12:32 AM2022-11-03T00:32:06+5:302022-11-03T00:32:51+5:30
Crime News: जेसीबीच्या बकेटने हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या रेती तस्करांपासून बचावासाठी तहसीलदारांनी रिव्हॉल्व्हरने हवेत दोन राऊंड फायर करण्याची घटना मोहाडी तालुक्यातील रोहा रेती घटावर बुधवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास घडली.
भंडारा - जेसीबीच्या बकेटने हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या रेती तस्करांपासून बचावासाठी तहसीलदारांनी रिव्हॉल्व्हरने हवेत दोन राऊंड फायर करण्याची घटना मोहाडी तालुक्यातील रोहा रेती घटावर बुधवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी मोहाडी ठाण्यात रात्री १० वाजता दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून जेसीबी चालकाला अटक करण्यात आली आहे.
माेहाडीचे तहसीलदार दीपक करंडे यांना बुधवारी सायंकाळी रोहा घटावर साठ्यातील रेतीची चोरी होत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून त्यांनी रोहा रेती घाट गाठला. तेथे जेसीबीच्या मदतीने ट्रकमध्ये रेती भरली जात होती. जेसीबी चालकाला कारवाईसाठी खाली उतरण्यास सांगितले. मात्र त्याने थेट जेसीबीच्या बकेटने तहसीलदांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तहसीलदार दीपक करंडे आत्मसंरक्षणासाठी रिव्हॉल्व्हरने एक राऊंड हवेत फायर केला. यानंतर जेसीबीसह चालक तेथून पासार झाला. तहसीलदरांनी पथकासह त्याचा पाठलाग केला. जेसीबी अडविला असता चालकाने पुन्हा जेसीबीच्या बकेटने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तेव्हाही तहसीलदारांनी पुन्हा एक राऊंड हवेत फायर केला. यानंतर जेसीबी चालक घटनास्थळावरून पसार झाला.
या घटनेची माहिती तहसीलदार दीपक करंडे यांनी मोहाडी पोलिसांना दिली. तात्काळ पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले. जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनीही घटनास्थळ गाठले. पोलिसांनी रेती तस्कारांचा शोध सुरू केला. या प्रकरणी जेसीबी मालक व चालका विरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी दिली. चालक रंजित ठवकर (रा. रोहा ता. मोहाडी) याला पोलिसांनी अटक केली. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.