टेमनी ग्रामपंचायतीने फुलविली आकर्षक बाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 10:02 PM2019-01-03T22:02:26+5:302019-01-03T22:02:50+5:30
कोणतेही शासकीय कार्यालय म्हटले की त्याचा परिसर रुक्ष. त्यातच गावखेड्यातील शासकीय कार्यालयाकडे तर कुणाचेही लक्ष नसते. गावाच्या एका बाजूला ही कार्यालये ओसाड झालेली दिसतात. मात्र फुलझाडांनी फुललेले एखादे शासकीय कार्यालय तेही गावखेड्यात बघायचे असेल तर तुम्हाला तुमसर तालुक्यातील टेमनीला जावे लागेल.
रंजित चिंचखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : कोणतेही शासकीय कार्यालय म्हटले की त्याचा परिसर रुक्ष. त्यातच गावखेड्यातील शासकीय कार्यालयाकडे तर कुणाचेही लक्ष नसते. गावाच्या एका बाजूला ही कार्यालये ओसाड झालेली दिसतात. मात्र फुलझाडांनी फुललेले एखादे शासकीय कार्यालय तेही गावखेड्यात बघायचे असेल तर तुम्हाला तुमसर तालुक्यातील टेमनीला जावे लागेल. सरपंच आणि गावकºयांच्या पुढाकारातून ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात सुंदर बाग फुलविण्यात आली आहे. येथे येणारा प्रत्येकजण प्रसन्न मनानेच घरी परततो.
टेमनी हे अडीच हजार लोक वस्तीचे गाव. गावात अंतर्गत रस्ते आणि नालीचे बांधकाम चकाचक रस्ते आहेत. याच गावाच्या ग्रामपंचायत इमारतीत ग्राम विकासाचा संदेश देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पुतळा आहे. राष्टÑसंताना अभिप्रेत गाव घडविण्याचा प्रयत्न गावकरी करीत आहेत. तत्कालीन सरपंच सतीश चौधरी आणि ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात बगीचा फुलविण्याचा निर्धार केला. बघता-बघता हा बगीचा तयार झाला. या बागेत हिरवळ तयार करण्यात आली. याठिकाणी येणारा प्रत्येकजण आता प्रसन्न होवून जात आहे. हाच पॅटर्न गावाच्या इतर चौकात राबविण्याचा निर्धार विद्यमान सरपंच पमु भगत यांच्या नेतृत्वात करण्यात आला आहे. गावात हिरवळीचा कृती आराखडा राबविण्यात येणार आहे.
रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड केली जाणार आहे. गावातील तलाठी कार्यालयाच्या आवारातही बगीचा तयार करण्याचा प्रयत्न आहे. गावात निरंतर स्वच्छता अभियान राबविली जाते. टेमनी येथील ग्रामपंचायत कार्यालयातील हा बगीचा सर्वांसाठी प्रेरणादायी असून प्रत्येक गावाने आदर्श घेण्याची गरज आहे. गावामध्ये जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात असून सौंदर्य वाढविण्याचा प्रयत्न सुरु आहे. असा उपक्रम राबविणारी टेमनी ही जिल्ह्यातील एकमेव ग्रामपंचायत असावी.
ग्रामपंचायत आवारात सुंदर बाग फुलविण्यात आली आहे. या बागेचे जतन केले जात आहे. हाच पॅटर्न अन्य चौकात राबविण्याचे नियोजन आहे. त्यासाठी गावकºयांच्या सहभाग महत्वाचा आहे.
- पमू धनराज भगत,
सरपंच, टेमनी