पारा भडकला, नागरिक घामाधूम, उष्णतेच्या लाटेची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 02:16 PM2023-05-19T14:16:51+5:302023-05-19T14:17:49+5:30
देवानंद नंदेश्वर भंडारा : सूर्य आग ओकू लागला आहे. सकाळी ९ वाजतापासून नागरिक घामाघूम होत आहे. येत्या काही दिवसांमध्ये ...
देवानंद नंदेश्वर
भंडारा : सूर्य आग ओकू लागला आहे. सकाळी ९ वाजतापासून नागरिक घामाघूम होत आहे. येत्या काही दिवसांमध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली. सध्या कमाल तापमान ४२ अंश आहे. उष्माघात होऊ नये, यासाठी नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपायांवर भर द्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.
हवामान बदलामुळे या वर्षी वातावरणीय बदलाला मोठ्या प्रमाणावर मानव जातीला तोंड द्यावे लागत आहे. वातावरणात होणाऱ्या बदलामुळे सध्या पृथ्वीचे तापमान वाढते आहे. वातावरणाचे तापमान ३० डिग्री सेल्सीअस असते तोपर्यंत मानवाला त्याचा काही त्रास होत नाही, त्यानंतर मात्र मानवी शरीर वातावरणातील उष्मा शोषून घेऊ लागते आणि त्याचे विपरित परिणाम मानवाच्या शरीरावर होऊ लागतात. तापमान आणि आर्द्रता यांचा मिळून होणारा परिणाम अधिक असतो. उष्णतेच्या लाटेमुळे होणारी हानी टाळण्याकरिता हिट ॲक्शन प्लॅन अर्थात उष्ण प्रतिबंधक कृती योजना आखण्यात आलेली आहे.
उष्माघाताची लक्षणे
शरीरास घाम सुटणे, तहान लागणे, शरीर शुष्क होणे, थकवा येणे, १०२ डिग्रीपेक्षा अधिक ताप येणे, त्वचा कोरडी व भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे, डोके दुखणे, रक्त्तदाब वाढणे, मानसिक बेचैन, बेशुद्ध अवस्था उलटी, अशी अनेक लक्षणे आहेत.
यांना असतो अधिक धोका
वय ५ पेक्षा कमी व ६५ वर्षांपेक्षा जास्त, कष्टाची सवय नसणारे लोक, धूम्रपान, मद्यपान करणारे आणि कॉफी पिणारे व्यक्ती, मूत्रपिंड, हृदयरोग, यकृत त्वचा विकार, लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी रुग्ण, स्टीमुलटन्स या औषधींचे सेवन सुरू असलेले रुग्ण, जास्त तापमान, वातानुकूलनाचा अभाव, अति आर्द्रता, तंग कपडे, शेतकाम, कारखान्यातील काम, ऊन आणि उष्णतेशी संबंधित व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना उष्माघाताची अधिक जोखीम असते.