उन्हाच्या तडाख्याने कोंबड्यांचा मृत्यू; कुक्कुटपालन व्यवसाय संकटात
By युवराज गोमास | Published: April 5, 2024 04:42 PM2024-04-05T16:42:57+5:302024-04-05T16:43:54+5:30
व्यवस्थापनावरील खर्च वाढला, कोंबड्यांच्या वजनात कमालीची घट.
युवराज गोमासे, भंडारा : कोंबडी हा पक्षी उष्ण रक्तवर्गीय गटात मोडताे. कोंबड्यांमध्ये घामग्रंथींचा अभाव असतो. उष्णता वाढताच पक्षी धापा टाकतात. अन्न व पाणी कमी उचलतात. परिणामी वजन कमी होते व मृत्यू पावतात, सध्या हे चित्र जिल्ह्यातील सर्वच कुक्कटपालन केंद्रात दिसून येत आहे. उन्हाच्या तडाख्याने कोंबड्यांचा मृत्यू वाढल्याने कुक्कुटपालन व्यवसाय संकटात सापडला आहे.
जिल्ह्यात शेतीला पूरक व्यवसाय म्हणून अनेक शेतकरी कुक्कुटपालन व्यवसाय करीत आहेत. यामुळे अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे. परंतु, सध्या तापमान ४३ अंशावर पोहचले असून पुढील दिवसात तापमान ४७ अंशापर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे. वाढते तापमान कुक्कुटपालन व्यवसायीकांचे टेन्शन वाढवित आहे. त्यातच पाणीटंचाई, वाढती महागाई संकटाच्या गर्ता आणखी रूंदावत आहेत. उन्हाळ्यात बॉयलर कोंबड्यांना सर्वाधिक उष्णतेचा त्रास जास्त जाणवतो. जिल्ह्यात १५ दिवसांपासून रात्री हलका गारवा आणि दिवसा कडक ऊन, असे वातावरण आहे. विषम हवामानामुळे कोंबड्या मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. पोल्ट्री व्यावसायिकांना आर्थिक फटका बसत आहे.
उन्हाळ्यात कोंबड्यांचे संगोपन अवघड-
उन्हाळा कोंबड्यांना मानवत नाही. रोगराईचे सावट पसरते. ताप व सर्दीसह विविध रोगांचा प्रादूर्भाव जाणवतो. परिणामी संगोपनाचे कार्य अवघड होते. कडक उष्णतेने कोंबड्या मोठ्या प्रमाणात थापा टाकतात. अन्न व पाणी कमी पितात. झपाट्याने वजन कमी होते. कोंबड्यांच्या मृत्यूची संख्या वाढते
वारंवार पाणी बदलणे धोक्याचे-
कोंबड्यांसाठी वारंवार पाणी बदलावे लागत नाही. त्यामुळे सर्दीचा धोका वाढतो. कोंबड्यांना शुद्ध व स्वच्छ पाणी एकाच ठिकाणी द्यावे लागते. मात्र, सध्या पाणी टंचाई निर्माण झाल्याने पोल्ट्री व्यवसाय करणे अवघड झाल्याचे चित्र आहे.
खाद्य २५ ते ३० टक्के महागले-
खाद्य पूर्वीचे दर आताचे दर
बायलर स्टार्टर १४०० २०००
लेअर चिक्रम १२०० १७००
फिनिशर १५०० १९००
तांदूळ कनी १२ २६
मका १२ २४
सोयाबीन ढेप ६० ४५
कुकुस ढेप ७ १६
सोयाबीन तेल ७० १००
खर्च वाढीस, उत्पन्न घटले-
हिवाळ्यात एक किलोचा पक्षी (कोंबडी) तयार करण्यासाठी साधारणत: ८० रूपयांचा खर्च यायचा. आता खाद्य व औषधांचा खर्च वाढल्याने तसेच मजुरी, कुलर, पंख्यांच्या व्यवस्थेसह व्यवस्थापन खर्च वाढल्याने एक किलोसाठी ११० रूपयांचा खर्च येतो आहे. त्यातच कोंबड्यांचा मृत्यू वाढल्याने आर्थिक नुकसान अधिक होत आहे.
सध्या आमच्याकडे १० हजार कोंबड्या आहेत. परंतु, कडक उन्हाने काेंबड्याचे वजन कमालीने घटते. व्यवस्थापन खर्चात दुप्पटीने वाढ झाली आहे. संभाव्य नुकसान टाळण्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागत आहे. त्यातच औषधी व खाद्य वाढल्याने पोल्टी व्यवसाय तोट्यात चालविला जात आहे. अनुदान देण्याची गरज आहे.- हेमलता मुंगूसमारे, पोल्ट्री व्यावसायिक महिला, जांभोरा.