भंडारा जिल्ह्यात दहा लाख क्विंटल धान उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2021 11:56 AM2021-02-03T11:56:09+5:302021-02-03T11:58:14+5:30

Bhandara News धान भरडाईच्या रकमेवरून शासन आणि राईस मिलर्स यांच्यातील तिढा अद्यापही सुटला नाही. परिणामी तब्बल दहा लाख क्विंटल धान सद्यस्थितीत उघड्यावर आहे.

Ten lakh quintals of paddy opened in Bhandara district | भंडारा जिल्ह्यात दहा लाख क्विंटल धान उघड्यावर

भंडारा जिल्ह्यात दहा लाख क्विंटल धान उघड्यावर

Next
ठळक मुद्देडीओचा तिढा कायम शासन आणि मिलर्सच्या वादात शेतकरी भरडतोय

 लोकमत न्यूज नेटवर्क 
भंडारा : धान भरडाईच्या रकमेवरून शासन आणि राईस मिलर्स यांच्यातील तिढा अद्यापही सुटला नाही. परिणामी तब्बल दहा लाख क्विंटल धान सद्यस्थितीत उघड्यावर आहे. सर्व गोदामे हाऊसफुल्ल झाली असून दुसरीकडे राईस मिलर्स डीओ उचलायला तयार नाही. अशीच स्थिती कायम राहिल्यास धान खरेदी ठप्प होण्याची भीती आहे.

भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत १७ लाख ९८ हजार ८३ क्विंटल धानाची आधारभूत केंद्रावर खरेदी करण्यात आली. दरवर्षी खरेदी झालेला धान गोदामात ठेवून तो मिलर्सला भरडाईसाठी दिला जातो. परंतु यावर्षी भरडाईचे दर वाढून देण्याच्या मुद्यावरून जिल्ह्यातील एकाही मिलर्सने डीओ उचलला नाही. परिणामी गोदामात धान पडून आहे. जिल्ह्यातील धान साठवण गोदामाची क्षमता केवळ आठ लाख क्विंटल आहे. त्यात खासगी सहकारी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोदामांचा समावेश आहे. अपुऱ्या गोदामांची समस्या असताना २ फेब्रुवारीपर्यंत सुमारे १८ लाख क्विंटल धानाची खरेदी झाली. एकीकडे धानाची उचल नाही आणि दुसरीकडे जिल्ह्यातील ९४ आधारभूत केंद्रांवर खरेदी सुरू आहे. अशा स्थितीत खरेदी झालेला धान उघड्यावर ठेवण्याची वेळ आली आहे. सध्या १० लाख क्विंटल जिल्ह्यातील विविध आधारभूत खरेदी केंद्रांवर उघड्यावर ठेवलेला आहे. गत आठवड्यात ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस झाला होता. त्याचा फटका काही प्रमाणात बसला. सुदैवाने अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात आला नाही. अन्यथा मोठे नुकसान सोसावे लागले असते.

जिल्ह्यातील २०३ मिलर्सनी पणन महासंघासोबत भरडाईसाठी ग्रिमेंट केले आहे. जिल्हा पणन कार्यालयाने ८० हजार क्विंटलचे डीओ तयार केले आहे. परंतु एकाही मिलर्सने अद्याप भरडाईसाठी धान उचलला नाही. शासन आणि मिलर्स यांच्यात सुरू असलेल्या या वादाचा फटका मात्र धान उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. गोदामे हाऊसफुल्ल झाल्याने जिल्ह्यातील ९४ आधारभूत केंद्रावरील खरेदी संथगतीने सुरू आहे. शेतकऱ्यांना धान विकण्यासाठी आठ ते दहा दिवस प्रतीक्षा करावी लागते. शासनाने या प्रकरणात तात्काळ तोडगा काढून धान भरडाईसाठी पाठविणे गरजेचे झाले आहे.

२७६ कोटींचे धान चुकारे

जिल्ह्यात ९४ आधारभूत खरेदी केंद्रांवर १७ लाख ९८ हजार ८३ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. आधारभूत किमतीनुसार या धानाची किंमत ३३५ कोटी ८८ लाख १९ हजार ७३५ रुपये आहे. यापैकी २७६ कोटी ४६ लाख ३७ हजार २३५ रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यात वळते करण्यात आले आहेत. तर ५९ कोटी ४१ लाख ८२ हजार ४९९ रुपयांचे चुकारे अद्यापही बाकी आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक धान खरेदी लाखांदूर तालुक्यात तीन लाख ९५ हजार ४०८ क्विंटल झाली असून सर्वात कमी खरेदी भंडारा तालुक्यात एक लाख २१ हजार २४६ क्विंटल खरेदी झाली आहे.

गोदामांची समस्या कायमच

भंडारा हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. परंतु धान साठविण्यासाठी गोदामांचा अभाव आहे. येथे खरेदी झालेला धान खासगी, सहकारी संस्था आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोदामांमध्ये ठेवावा लागतो. या गोदामांची क्षमता केवळ आठ लाख क्विंटल आहे. त्यामुळे खरेदी झालेला धान ठेवण्याचा प्रश्न निर्माण होतो. गोदामांअभावी धान खरेदीची गतीही मंदावते.

Web Title: Ten lakh quintals of paddy opened in Bhandara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती