शेतकऱ्यांकडून वांगे दहा रुपये किलो; ग्राहकांच्या पदरात मात्र तीस रुपये दराने !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:37 AM2021-08-26T04:37:43+5:302021-08-26T04:37:43+5:30
भंडारा : भरपूर पावसानंतर भाजीपाल्याचे भाव काही प्रमाणात गडगडले असले तरी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या पदरात मात्र निराशाच पडते आहे. एकीकडे ...
भंडारा : भरपूर पावसानंतर भाजीपाल्याचे भाव काही प्रमाणात गडगडले असले तरी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या पदरात मात्र निराशाच पडते आहे. एकीकडे शेतकऱ्यांना कमी दरात भाजीपाला विकावा लागतो तर दुसरीकडे मात्र ग्राहकांना महागाई वाढल्याचे कारणावरून जादा भावाने भाजीपाला खरेदी करावा लागत आहे. त्यामुळे मधले व्यापारीच मोठे होत आहेत. शेतकरी मात्र वर्षानुवर्षांपासून हलाखीचेच जीवन जगत आहे तर दुसरीकडे व्यापारी मात्र अलिशान गाड्यांमधून फिरतात. ही वेळ कशामुळे निर्माण होत आहे. याचे सरकारने विचारमंथन करण्याची गरज आहे. देशी वाणांना अनेक ग्राहक पसंती देत असले तरी याचे उत्पादन फारसे होत नसल्याने शेतकऱ्यांना ते परवडत नाही. महिलांची देशी वाणांसह सेंद्रीय भाजीपाल्याला मागणी वाढत असल्याचे सेंद्रीय उत्पादक शेतकरी तानाजी गायधने यांनी सांगितले. जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे मात्र, तरीही भाजीबाजारात पालेभाज्यांचे दर वाढलेलेच दिसत आहेत. एकीकडे वाढती महागाई तर दुसरीकडे रोजगाराची संधी कमी होत असल्याने अनेकांना घर चालविताना कसरत करावी लागत आहे. मात्र, कोणताही राजकीय पक्ष यावर लक्ष देत नसल्याने आता सर्वसामान्यांनी जगायचे कसे, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. सरकार एकीकडे आश्वासने देते. मात्र, दुसरीकडे जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीही कमी करणे सरकारला शक्य होईनासे झाले आहे. यामुळे रोजच्या आहारातील पालेभाज्या गरिबांच्या ताटात दिसेनाशा झाल्या आहेत.
बॉक्स
भावात एवढा फरक कसा
जिल्ह्यात भाजीपाल्याचे क्षेत्र वाढले आहे. मग तरीही भाजीपाला इतका महाग कसा, असा प्रश्न ग्राहकांना सतावत आहे.
जिल्ह्यात वांगी, कारले, मिरची, भेंडीसारखी भाजीपाल्याची पिके घेतली जातात. मात्र, फळभाज्या आणि पालेभाज्यांसाठी मात्र आजही जिल्ह्याला इतर जिल्ह्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. व्यापारीच दिवसेंदिवस मोठे होत असल्याने प्रशासनाने यावर अंकुश ठेवायला हवा. मात्र, अनेकजणांचे हितसंबंध आडवे येत असल्याने बळिराजा भरडला जात आहे.
त्यामुळे पालेभाज्या खाण्याचे प्रमाणही कमी केले आहे
ग्राहकांना परवडेना...
कोट
आधी दोनशे रुपयांत आठवड्याचा भाजीपाला मी खरेदी करत होते. मात्र, आता भाजीपालाच काय प्रत्येक गोष्टीत महागाई वाढत आहे. भविष्यात गरिबांना आणखी किती महागाईला तोंड द्यावे लागणार आहे, माहिती नाही.
- वंदना वैद्य, गृहिणी
सरकारने वाढत्या महागाईवर अंकुश ठेवायला हवा. भाज्यांचे दर हे वाढलेले असले तरी प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांच्या हाती कमीच दर पडतो आहे. यातून कोण व्यापारीच मोठे होत आहे ना एकवेळ शेतकऱ्यांना चार पैसे मिळाले तर काही वाटत नाही.
अनिता गिर्हेपुंजे,गृहिणी
कोट
सरकारने पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करायला हव्यात. आम्ही बाजारात भाजीपाला विकतो. तोच भाजीपाला ग्राहकांना तब्बल किलोमागे वीस ते तीस रुपये जादा दराने विक्री होतो. एकीकडे आमचा लागवडीचा खर्चही निघणे मुश्कील झाले आहे.
शाम आकरे, शेतकरी, चिखली.
कोट
सर्वच खर्च वाढल्याने बळिराजाला शेती करणे कठीण झाले आहे. कोणतेही पीक घेतले तरी दराचा प्रश्न आहे. जोपर्यंत सरकार शेतकऱ्यांचा विचार करणार नाही. तोपर्यंत आपण अमेरिका, जपान, इजिप्त देशासारखी प्रगती करू शकणार नाही. सरकारने शेतकरी हिताला प्राधान्य दिले पाहिजे.
- चैतराम हिवसे, शेतकरी खराडी.