मंगळसूत्र गाहाण ठेवून कर्करोगग्रस्त बालकाला दहा हजारांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:40 AM2021-09-15T04:40:50+5:302021-09-15T04:40:50+5:30
तुमसर : मदत करायला पैसेच पाहिजेत असे नाही तर संवेदनशील मन आणि दान करण्याची जबरदस्त इच्छाशक्ती हवी असते. तुमसर ...
तुमसर : मदत करायला पैसेच पाहिजेत असे नाही तर संवेदनशील मन आणि दान करण्याची जबरदस्त इच्छाशक्ती हवी असते. तुमसर तालुक्यातील एका महिलेने जवळ पैसे नसताना एका कर्कराेगग्रस्त बालकाला मदतीचा हात दिला. आपले सौभाग्याचे लेणे मंगळसूत्र गहाण ठेवून दहा हजाराची मदत केली. लता हिरालाल नागपुरे असे दानशूर महिलेचे नाव असून त्यांच्या दातृत्वाची पंचक्रोशीत चर्चा आहे.
सीलेगाव येथील आदित्य योगेश्वर खऊळ (११) याला कर्करोग झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले. त्यामुळे खऊळ कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. घरात अठराविश्वे दारिद्र्य, आदित्यचा उपचार कसा करावा, असा प्रश्न उभा ठाकला. सीलेगाव येथे आदित्यच्या आजारांची चर्चा घरोघरी सुरू झाली. निरागस आदित्यला मदत करावी असे लता नागपुरे यांनी आपल्या कुटुंबीयांना सांगितले. मात्र घरीही तेवढे पैसे नव्हते. एका बालकाला आपण मदत करू शकत नाही याची खंत लता यांना होती. त्यांनी मदत करायचे निश्चित केले. काय करावे, कोठून पैसा आणावा, असा प्रश्न त्यांच्या पुढे होता. मात्र क्षणात आपल्या गळ्यातील मंगळसूत्र आठवले. कोणताही विचार न करता त्यांनी आपले मंगळसूत्र गहाण ठेवून दहा हजार रुपये आणले. घरी आल्यावर त्यांनी ही माहिती कुटुंबीयांना दिली. मंगळवारी पती हिरालाल, पत्नी लता व ग्रामस्थ योगेश्वर खऊळ यांच्या घरी गेले. आदित्यच्या प्रकृतीची विचारपूस केली व आदित्यच्या हातात उपचारांसाठी दहा हजार रुपये दिले. तेव्हा वातावरण धीरगंभीर बनले. आदित्य व त्यांच्या कुटुंबीयांच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. ग्रामस्थांनीसुद्धा आदित्यच्या उपचाराकरिता मदत देऊ केली आहे.
बॉक्स
मदतीचे आवाहन
लता नागपुरे यांनी गरीब आदित्यच्या उपचारांसाठी मंगळसूत्र गहाण ठेवून दहा हजाराची मदत देऊन समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. आदित्यच्या जीवनात नवीन उमेद निर्माण करण्याचा प्रयत्न लता यांनी केला. तसेच तुम्ही एकटे नाहीत, समाज तुमच्या पाठीशी आहे असा विश्वास प्रत्यक्ष कृतीतून त्यांनी दिला. शासनातर्फे विविध योजना राबविण्यात येत आहेत, परंतु गरजू गरिबांना वेळेवर आर्थिक मदत मिळत नाही, अशी खंत लता नागपुरे यांनी बोलून दाखविली. समाजातील इच्छुक दानदात्यांनी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोट
सीलेगाव येथील आदित्य खऊळ या बालकाला कर्करोग झाल्याची माहिती मला ग्रामस्थांकडून मिळाली. त्यानंतर माझे मन बेचैन झाले. आदित्यला मदत करावी अशी मनातून इच्छा जागृत झाली. त्यामुळे मंगळसूत्र गहाण ठेवून मदत केली. समाजातील घटकांनीसुद्धा आदित्यला मदत करावी. त्याच्या जीवनात नवी उमेद निर्माण होईल.
- लता नागपुरे, सीलेगाव