आठ वर्षांत आढळले दहा हजार क्षयरुग्ण

By admin | Published: March 30, 2017 12:34 AM2017-03-30T00:34:34+5:302017-03-30T00:34:34+5:30

२१ ते ३० मार्च या कालावधीत जागतिक क्षयदिन जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येतो.

Ten thousand tubercules found in eight years | आठ वर्षांत आढळले दहा हजार क्षयरुग्ण

आठ वर्षांत आढळले दहा हजार क्षयरुग्ण

Next

६५८ रुग्णांचा मृत्यू : ७ हजार १७३ रुग्ण औषधोपचारानंतर झाले बरे
भंडारा : २१ ते ३० मार्च या कालावधीत जागतिक क्षयदिन जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येतो. आरोग्य विभाग क्षयरोगावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळविल्याचा दावा नेहमी करते. मात्र त्यांचा हा दावा फोल ठरला असून मागील आठ वर्षात जिल्ह्यात ९ हजार ९४७ क्षयरुग्ण आढळले असून यातील तब्बल ६५८ रुग्णांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक अहवाल उघडकीस आला आहे.
सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत अ‍ॅडव्होकेसी कॅम्युनिकेशन अ‍ॅण्ड सोशल मोबिलायझेशन प्रभाविपणे राबविण्यात येत असून क्षयरोगावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळविल्याचा दावा जिल्हा क्षयरोग व आरोग्य विभागाने केला आहे. मात्र त्यांचा हा दावा कितपत सत्य आहे, हे त्यांनीच सादर केलेल्या अहवालावरुन सिध्द होते.
त्यांनी सादर केलेल्या अहवालात सन २००९ ते डिसेंबर २०१६ या आठ वर्षात जिल्ह्यातील तब्बल ६५८ क्षयरुग्णांना मृत्यूने कवटाळले आहे. तर ९ हजार ९४७ क्षयरुग्ण आढळल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. दिवसागणीक क्षयरुग्णांची संख्या कमी होत असली तरी परिस्थिती पुर्णपणे नियंत्रणात आणण्यात जिल्हा क्षयरोग अधिकारी व आरोग्य विभाग अपयशी ठरले आहे.
‘आरोग्यम् धनसंपदा’ या वचनाप्रमाणे आरोग्य हीच आपली संपत्ती असा दावा आरोग्य विभागाने केला आहे. मात्र त्यांनी केलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात ते अपयशी ठरल्याने नागरिकांचे जीव अजूनही धोक्यातच आहेत.
भंडारा जिल्ह्यात एमडीआर व एक्सडीआर या क्षयरोग आजाराचे रुग्ण आढळून आलेले आहेत. सन २००७ पासून माहे डिसेंबर २०१६ अखेर एमडीआरच्या १३५ रुग्णांचे निदान करण्यात आले आहे. त्यापैकी २६ रुग्णांचा मृत्यू झाला असून ३७ रुग्ण बरे झाले असून १८ रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा क्षयरोग कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
एक्सडीआरच्या आठ क्षयरुग्णांचे निदान झाले असून यात एकाचा मृत्यू झाला आहे. खासगी दवाखान्यातून औषधोपचार घेत असताना व त्याची नोंद सन २०१६ पासून शासकीय यंत्रणेत करण्यात येत आहे. वरील टक्केवारुन क्षयरुग्ण संख्येत अल्पशा घट झाली आहे. परंतु यापेक्षाही जास्त क्षयरोग रुग्ण समाजात असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याची कबुली जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. एन. एस. वानखेडे यांनी दिली आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Ten thousand tubercules found in eight years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.