वैनगंगेच्या प्रवाहाचा दहा गावांना धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 10:11 PM2019-05-10T22:11:00+5:302019-05-10T22:11:25+5:30

जीवनदायी वैनगंगा नदीचा प्रवाह गत काही वर्षांपासून गावाच्या दिशेने सरकत आहे. तिरावरील ४२ हेक्टर शेती नदीपात्रात गिळकृंत झाली आहे. संरक्षक भिंत बांधली नाही तर नदी तिरावरील सुमारे दहा गावांना धोका पोहचण्याची शक्यता आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाने संरक्षक भिंतीसाठी ५० लाखांचा निधी मंजूर केला.

Ten villages of Wainganga stream threat | वैनगंगेच्या प्रवाहाचा दहा गावांना धोका

वैनगंगेच्या प्रवाहाचा दहा गावांना धोका

googlenewsNext
ठळक मुद्देसंरक्षण भिंत हवी : ४२ हेक्टर शेती झाली नदीपात्रात गिळंकृत

मोहन भोयर।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : जीवनदायी वैनगंगा नदीचा प्रवाह गत काही वर्षांपासून गावाच्या दिशेने सरकत आहे. तिरावरील ४२ हेक्टर शेती नदीपात्रात गिळकृंत झाली आहे. संरक्षक भिंत बांधली नाही तर नदी तिरावरील सुमारे दहा गावांना धोका पोहचण्याची शक्यता आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाने संरक्षक भिंतीसाठी ५० लाखांचा निधी मंजूर केला. परंतु हा निधी तोकडा असून १० ते १५ कोटींच्या निधींसाठी आमदार चरण वाघमारे प्रयत्नशील आहे.
तुमसर तालुक्यातील विशालपात्र असलेली वैनगंगा वाहते. या नदीपात्रात मोठ्या प्रमाणात रेती आहे. लाखो ब्रासचा उपसा अहोरात्र सुरु आहे. तुमसर व तिरोडा तालुक्याच्या सीमा येथे लागून आहे. भंडारा व गोंदिया जिल्हा प्रशासन दरवर्षी रेतीघाटांचा येथे लिलाव करते. बेसुमार रेतीचा उपसा होते. त्यामुळे वैनगंगा नदीचा प्रवाह बदलत चालला आहे. तो गावाच्या दिशेने सरकत आहे.
तुमसर तालुक्यातील रेंगेपार, मांडवी, उमरवाडा, बोरी, कोष्टी, ब्राम्हणी येथील वैनगंगा नदीचा प्रवाह झपाट्याने गावाच्या दिशेने सरकत आहे. आतापर्यंत सुमारे ४२ हेक्टर शेतजमीन नदीपात्रात गिळंकृत झाली आहे. सर्वाधिक शेती बोरी, उमरवाडा, रेंगेपार येथे नदीपात्रात गेली आहे. गाळाची सुपीक जमीन नदीपात्रात गेली. परंतु त्याचा मोबदला मिळाला नाही. नैसर्गिकरित्या शेती नदीपात्रात गेल्याचे सांगण्यात येते. नदीतिरावरील शेतकरी या प्रकाराने हवालदिल झाले आहे. बोरी येथील लाखो रुपयांची पाणीपुरवठा योजना नदीपात्रात सामावले आहे अशी स्थिती नदी काठावरील इतरही गावांची आहे. याठिकाणी संरक्षक भिंत उभारली नाही तर गावांनाही धोका निर्माण होवू शकतो.
वैनगंगा नदीचे पात्र विशाल आहे. या पात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी केली जाते. रेतीची नैसर्गिक संरक्षक भिंत असलेली थडी वाहतुकीसाठी फोडली जाते. त्यामुळेही अनेकदा नदीचा प्रवाह बदलतो. उन्हाळ्याच्या दिवसात त्याचा धोका दिसत नसला तरी पावसाळ्यात मात्र अनेक गावात पाणी शिरण्याची भीती निर्माण होते. आता याठिकाणी संरक्षक भिंत उभारल्यास नदीचा प्रवाह योग्यरित्या प्रवाहित होईल. तसेच तस्करांनाही अटकाव करण्यात मदत होणार आहे. गरज आहे ती निधीची. या निधीसाठी लोकप्रतिनिधीनी पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे.

जिल्हा नियोजन समितीत चर्चा
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ही बाब आमदार चरण वाघमारे यांनी निदर्शनास आणून दिली. बोरीसह इतर गावांना वैनगंगा नदीचा प्रवाहाचा धोका असल्याने संरक्षक भिंत बांधण्यासाठी निधी मंजूर करण्याची मागणी केली. ना. बावनकुळे यांनी ५० लाख रुपये संरक्षक भिंतीसाठी मंजूर केले. जिल्हा परिषदेचे उपविभागीय अभियंता अरविंद डाकरे व राज्यशासनाचे नागपूर येथील कार्यकारी अभियंता ताले यांनी बोरी येथील नदीपात्राचे पाहणी केली आहे.

संरक्षक भिंत कुचकामी ठरणार
नदी तीरावरील माती भुसभुसीत असून नदीचे पात्र मोठे आहे. पावसाळ्यात पाण्याचा प्रवाहला मोठी गती असते. त्यामुळे संरक्षक भिंत ठासळण्याची भीती असते. त्यामुळे सदर परिसराचे संर्वेक्षण राज्य शासनाच्या संबंधीत खात्याचे वरिष्ठ अधिकारी करणार आहे. सर्वेक्षणाचा अंतीम अहवाल राज्य शासनाकडे पाठविला जाईल. राज्य शासनाने मोठा निधी उपलब्ध करुन दिला तरच उपाययोजनेला गती मिळणार आहे. सदर कामासाठी आमदार चरण वाघमारे प्रयत्नशील आहेत. शासनाकडून भरीव निधीची अपेक्षा आहे.

नदी प्रवाह वळविणे गरजेचे
स्थापत्य अभियंता तथा आपत्ती व्यवस्थापन विभागाने येथे वैनगंगा नदी प्रवाह नदीचा मध्यभागातून वळविण्याच्या सुचना केल्या आहे. त्यादिशेने येथे कारवाई केल्यास नदी तिरावरील गावांमध्ये पाण्याचा प्रवाह शिरणार नाही. प्रायोगीक तत्वावर हे काम करणे गरजेचे आहे. बोरी येथे पाहणी करताना सरपंच अविनाश उपरीकर, डोंगरलाचे सरपंच उमेश बघेले उपस्थित होते.

Web Title: Ten villages of Wainganga stream threat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :riverनदी