दहा वर्षापासून शासकीय इमारत धूळखात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 12:46 AM2019-06-10T00:46:18+5:302019-06-10T00:46:57+5:30
तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील लाखनी शहराचे उपशहर असलेल्या मुरमाडी (सावरी) येथे दहा वर्षापूर्वी शासकीय इमारत आमदार निधीतून तयार करण्यात आली. सदर इमारतीचा उपयोग होत नसल्याने अवैध कामाचा केंद्र बनले आहे.
चंदन मोटघरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील लाखनी शहराचे उपशहर असलेल्या मुरमाडी (सावरी) येथे दहा वर्षापूर्वी शासकीय इमारत आमदार निधीतून तयार करण्यात आली. सदर इमारतीचा उपयोग होत नसल्याने अवैध कामाचा केंद्र बनले आहे.
मुरमाडी (सावरी) ग्रामपंचायतच्या क्षेत्रात येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील लाखनीचे नावाने असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाच्या परिसरात शासकीय इमारत तयार करण्यात आली आहे. त्या इमारतीमध्ये जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्या शासकीय इमारती समोरील जागेसाठी वाद सुरु होते. सदर वाद संपुष्टात असल्याची चर्चा आहे. इमारतीचे मालकी हक्क सार्वजनिक बांधकाम विभागाने ग्रामपंचायत मुरमाडीकडे सोपविले आहे.
माजी आमदार सेवक वाघाये यांच्या निधीतून तयार झालेल्या इमारतीसाठी १० ते १२ वर्षापूर्वी ७ ते ८ लक्ष रुपये खर्च करण्यात आले. सदर इमारतीवरुन राजकीय वाद निर्माण झाले होते. वाद संपुष्टात आला. इमारत तयार करण्यात आली. परंतु सदर इमारत पडीत अवस्थेत आहे. या इमारतीमध्ये ग्रामपंचायतचे कामकाज चालविण्यात येणार होते. परंतु मागील तीन वर्षापूर्वी नवीन ग्रामपंचायत भवन तयार करण्यात आले. इमारतीचा वापर होत नसल्याने इमारत खराब होत आहे. इमारतीच्या परिसरात दारुच्या बाटल्या पडलेल्या आहेत. इमारतीसमोर असलेले छोटे व्यवसायीक कचरा इमारत परिसरात टाकतात.
सदर इमारतीचा वापर अवैध कामासाठी केला जात आहे. अनेक शासकीय व निमशासकीय कार्यालयाला जागा हवी आहे. त्या इमारतीचा उपयोग शासकीय कार्यालयासाठी केला जाऊ शकतो.
मुरमाडी ग्रामपंचायत या सभागृहाचा वापर कार्यक्रमासाठी करू शकते किंवा शासकीय उपक्रमासाठी इमारतीचा वापर केला जाऊ शकतो. शासकीय निधीचा उपयोग करून इमारत उभी करण्यात आली आहे. त्या इमारतीचा वापर जनतेसाठी होणे आवश्यक आहे. अन्यथा इमारत उपयोगाविना निकृष्ट होईल.
सदर इमारत दुरुस्त करून शासकीय कामकाजासाठी देण्यात येईल. त्यामुळे ग्रामपंचायतचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल.
-सुनिता भालेराव,
सरपंच, मुरमाडी (लाखनी)