उड्डाणपुलाची निविदा एप्रिलमध्ये
By Admin | Published: March 28, 2017 12:18 AM2017-03-28T00:18:48+5:302017-03-28T00:18:48+5:30
रामटेक - तुमसर - तिरोडा - गोंदिया रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपुलाचे काम मागील अडीच वर्षापासून सुरु आहे.
वाहतुकीची कोंडी : खा.पटोले यांनी घेतली आढावा बैठक
तुमसर : रामटेक - तुमसर - तिरोडा - गोंदिया रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपुलाचे काम मागील अडीच वर्षापासून सुरु आहे. एप्रिल महिन्यात रेल्वे प्रशासन निविदा काढणार आहे. दोन वर्षानंतर रेल्वे येथे निविदा काढत आहे. रविवारी सायंकाळी खासदार नाना पटोले यांनी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंत्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून कामाचा आढावा घेतला. राज्य शासनाने यापूर्वीच उड्डाणपुलाची कामे सुरु केली आहेत.
रामटेक - तुमसर - तिरोडा - गोंदिया रस्त्याला १३५ / ६०० मध्ये हावडा मुंबई रेल्वे मार्ग छेदतो. हावडा मुंबई रेल्वे मार्गावर रेल्वे वाहतुकीची वारंवारता अधिक आहे. केंद्रीय रस्ते निधीतून २५ कोटीची प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली. रेल्वे प्रशासनाने १८ कोटी व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून २५ कोटी एवढा निधी खर्च करण्यात येणार आहे. पुलाची लांबी ८०.४२५ मिटर इतकी राहणार आहे. अप्रोच रस्त्याचे काम प्रगतीपथावर सुरु आहे. पुलाची लांबी ११४१ मिटर आहे. तर रुंदी १२ मिटर आहे. रेल्वे खात्याच्या हद्दीतील काम रेल्वे खाते करणार राज्य शासनाच्या हद्दीतील काम सार्वजनिक बांधकाम विभाग करणार आहे. रेल्वे खाते व सार्वजनिक बांधकाम खाते येथे ५०-५० टक्केखर्चाचा भार उचलणार आहे. रविवारी खासदार नाना पटोले यांनी देव्हाडी येथे उड्डाणपुल बांधकामबाबाबद आढावा घेतला. सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता नरेश वडेटवार स्थापत्य अभियंता बी.आर. पिपरेवार, यांचेशी चर्चा करून माहिती घेतली. एप्रिल महिन्यात रेल्वे प्रशासन रेल्वे अंतर्गत कामाची निविदा काढणार असल्याची माहिती खा.नाना पटोले यांनी दिली. सार्वजनिक बांधकाम विभाग नागपूर व बिलासपूर येथील रेल्वेचे स्थापत्य अभियंते येथे संयुक्त बैठक घेऊन पुलाची ड्राइंगसह इतर महत्वपूर्ण कामांचा संयुक्तरित्या कामे करतात. (तालुका प्रतिनिधी)