जंगल भागात तेंदूपत्ता तोडणीला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:36 AM2021-05-12T04:36:43+5:302021-05-12T04:36:43+5:30
बारव्हा : लाखांदूर तालुक्यातील बारव्हा परिसरात तेंदूपत्ता तोडणी हंगामाला सुरुवात झाली आहे. परिसरातील मानेगाव, बोरगाव, दहेगाव, दांडेगाव, कोच्छी येथे ...
बारव्हा : लाखांदूर तालुक्यातील बारव्हा परिसरात तेंदूपत्ता तोडणी हंगामाला सुरुवात झाली आहे. परिसरातील मानेगाव, बोरगाव, दहेगाव, दांडेगाव, कोच्छी येथे तेंदूपत्ता तोडणी हंगामासाठी अनेक मजूर वाढत्या तापमानातही दररोज जात आहेत. ग्रामीण भागातील अनेक गावांतील नागरिक पहाटेपासून जंगलामध्ये जाऊन तेंदूपत्ता तोडणीच्या कामाला लागत असून मजुरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
कोरोनामुळे लागू असलेल्या संचारबंदीमध्ये तेंदूपत्ता संकलनातून नागरिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. लॉकडाऊनमध्ये सर्व दुकाने बंद आहेत. नागरिकांच्या हाताला काम नाही. प्रत्येक लहान-मोठ्या व्यवसायावर संचारबंदीचा परिणाम झाला आहे. बहुतांश कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. अशातच तेंदूपत्ता संकलन सुरू झाल्याने अनेक नागरिक तेंदूपत्ता तोडणीसाठी जात आहेत. त्यापासून मजुरांना आर्थिक मिळकत होत आहे.
बारव्हा परिसरामधील बऱ्याच गावांमध्ये तेंदूपत्ता पुडे बांधण्याची कामे सुरू झाले असून यामुळे आर्थिक उलाढाल होत आहे. या कामात कुटुंबातील लहान मुलांपासून तर मोठ्या व्यक्तीपर्यंत सर्वच व्यस्त असल्याचे दिसून येत आहेत. मानेगाव, बोरगाव, दहेगाव, दाडेगाव, कोच्छी परिसर हा जंगलाने व्यापलेला आहे. उन्हाळ्यात जंगलातील तेंदूपत्त्याच्या झाडाला पाने यायला सुरू होतात. जंगलाला लागून असलेल्या गावांतील नागरिक यातून बऱ्यापैकी आर्थिक प्राप्ती करतात. तेंदूपत्ता संकलनातून अनेक गरीब कुटुंबांना आर्थिक मदत होत आहे. त्यामुळे संचारबंदीत तरी कुटुंबावर ओढवलेली उपासमारीची वेळ टळली आहे.