पवनी तालुक्यात तेंदूपत्ता संकलनाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:34 AM2021-05-16T04:34:21+5:302021-05-16T04:34:21+5:30
पवनी : तालुक्यातील जंगलव्याप्त क्षेत्रातील शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य नागरिकांचा मुख्य आर्थिक स्रोत म्हणून तेंदूपत्ता हंगामाकडे पाहिले जाते. ...
पवनी : तालुक्यातील जंगलव्याप्त क्षेत्रातील शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य नागरिकांचा मुख्य आर्थिक स्रोत म्हणून तेंदूपत्ता हंगामाकडे पाहिले जाते. कमी दिवसात अधिक उत्पन्न देणारा रोजगार म्हणून तेंदूपत्ता संकलनाच्या कामाला ग्रामीण भागातील मजूर प्राधान्य देत असतात. यावर्षीच्या तेंदूपत्ता संकलनाला प्रारंभ झाला असून, वाघाची दहशत मात्र कायम आहे.
तालुक्यातील सावरला, कन्हाळगाव, गुडेगाव, धानोरी, भुयार, वायगाव, निष्ठी, सिरसाळा, वाही या गावांमध्ये तेंदूपत्ता संकलनाच्या कामाला सुरुवात झाली आहे. या परिसरात वाघ व बिबट्याची दहशत कायम असताना मजूर मात्र जीव मुठीत घेऊन तेंदूपत्ता संकलनाच्या कामासाठी पहाटेच जंगलात जायला घरुन निघतात.
राज्यात संचारबंदीचा काळ सुरू असून, सर्वसामान्य जनतेला त्याचा आर्थिक फटका बसला आहे. परंतु, तेंदू हंगाम सुरू झाल्यामुळे संचारबंदीत रोजगाराचा प्रश्न दूर झाल्याने मजुरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तेंदू हंगामाच्या रकमेतून पावसाळ्यात उदरनिर्वाहाकरिता लागणारा खर्च व शेती अवजारे, खत यांचा खर्चही केला जातो.
राज्यात कडक निर्बंध व संचारबंदी असल्याने यावर्षी तेंदू हंगाम होणार की नाही, अशी चर्चा सुरू होती. परंतु, पेसा अंतर्गत तेंदूपत्ता हंगाम सुरू झाल्याने मजुरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.