तेंदुपत्ता संकलनातून मिळणार हजारो मजुरांना रोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:37 AM2021-05-08T04:37:22+5:302021-05-08T04:37:22+5:30
लाखांदुर : वनक्षेत्रातील ग्रामस्थांना रोजगार मिळावा, यासाठी वनविभागाने तेंदूपत्ता संकलनास मान्यता दिली आहे. लाखांदूर तहसीलमधील दोन युनिटअंतर्गत असलेल्या २३ ...
लाखांदुर : वनक्षेत्रातील ग्रामस्थांना रोजगार मिळावा, यासाठी वनविभागाने तेंदूपत्ता संकलनास मान्यता दिली आहे. लाखांदूर तहसीलमधील दोन युनिटअंतर्गत असलेल्या २३ गावांत तेंदूपत्ता संकलनाचे काम सुरू करण्यात आले आहे. संचारबंदीच्या काळात मजुरांच्या हाताला काम मिळणार आहे.
तालुक्यात नियमित कोविड चाचण्यांदरम्यान कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहे. अशा परिस्थितीत संचारबंदीमुळे खेड्यांमध्येही आर्थिक संकट दिसून येत आहे.
दरम्यान, यावर मात करण्यासाठी वनविभागाने शासकीय निर्देशांचे पालन केले, तर तेंदूपत्ता संकलन करता येणार आहे. तालुक्यामध्ये वनविभागांतर्गत दोन तुकड्यांमध्ये तेंदूपत्ता संकलनास मान्यता देण्यात आली आहे. या तुकड्यांमध्ये पिंपळेगाव-जैतपूर आणि दिघोरी-पारडी यांचा समावेश आहे. पिंपळगाव-जैतपूर युनिटअंतर्गत सोनी, इंदोरा, पिंपळगाव, चिचगाव, पुयार, कन्हाळगाव, धर्मपुरी, दांडेगाव, कोच्छी, चिचोली, पालेपेंढरी, तिरखुरी, हरदोली आणि पेंढरी या गावात तेंदूपत्ता संकलित केले जातील. दिघोरी-पारडी तुकडी अंतर्गत दिघोरी मोठी, पारडी, मुर्झा, मानेगाव, चिकना, तावशी, मुरमाडी, दहेगाव, झरी आणि मालदा या गावात तेंदूपत्ता संकलित केले जाईल.
कोरोना पार्श्वभूमीवरील शासकीय निर्देशांचे अनुपालन करून सुरू केलेले, तेंदूपत्ता संकलन केंद्रात ७० पानांच्या पुड्याची खरेदी करेल आणि १०० पुड्यांची किंमत २२७ ते २३२ रुपये असल्याची माहिती देण्यात आली आहे. तालुक्यातील कोणत्याही केंद्रांतर्गत तेंदूपत्ता कामगारांना कमी किंमत दिल्यास, त्यांच्या तक्रारीवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना वनविभागामार्फत देण्यात आल्या आहेत. वनविभागाने तालुक्यातील ग्रामस्थांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तेंदूपत्ता संकलन करण्याचे काम तालुक्यातील २३ गावांतर्गत हजारो नागरिकांना मजुरी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
बॉक्स
कोरोना नियमांचे पालन आवश्यक आहे
रूपेश गावित
तालुक्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता, तेंदूपत्ता संकलन केंद्राच्या कामगारांसह सर्व मजूर व नागरिकांना कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. या नियमांनुसार मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्स यांचे पालन करण्यासाठी आवश्यक सूचना लाखांदूरचे वनपरिक्षेत्राधिकारी रूपेश गावित यांनी दिल्या आहेत.