सर्व शाळांचा दहावीचा निकाल शंभर टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:26 AM2021-06-01T04:26:45+5:302021-06-01T04:26:45+5:30

इंद्रपाल कटकवार लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने यंदाची दहावी बोर्डाची परीक्षा ...

Tenth result of all schools is one hundred percent | सर्व शाळांचा दहावीचा निकाल शंभर टक्के

सर्व शाळांचा दहावीचा निकाल शंभर टक्के

Next

इंद्रपाल कटकवार

लोकमत न्यूज नेटवर्क

भंडारा : कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने यंदाची दहावी बोर्डाची परीक्षा रद्द केली. आता शिक्षण विभागाने मूल्यमापनाचे धोरण जाहीर करून निकाल जाहीर करण्याचे सुतोवाच केले आहे. त्यामुळे सर्व शाळांचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागणार यात शंका राहिलेली नाही, परंतु या निकाल पद्धतीने विद्यार्थ्यांमध्ये कुठे आनंद तर कुठे निरुत्साह पाहायला मिळत आहे. पालकांमध्येही तशीच स्थिती बघायला मिळत आहे.

भंडारा जिल्ह्यात इयत्ता दहावीचे १८ हजार १११ विद्यार्थी परीक्षा देणार होते; मात्र कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आली. पहिल्या वेळेस परीक्षा रद्द झाल्यानंतर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सदर परीक्षा होतील, असे वाटत होते पण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच गेला आणि अपेक्षेनुरूप इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या.

आता विद्यार्थी खूश असले तरी पालकांमध्ये समोरील शिक्षण प्रवेश प्रक्रियेबाबत चिंता पाहायला मिळत आहे. दहावीनंतर अकरावीच्या प्रवेशासाठी स्वतंत्र सीईटी पण तेही ऐच्छिक राहणार असल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. एकंदरीत दहावीनंतर पुढील शिक्षणासाठी शिक्षणतज्ज्ञ ही वेगवेगळ्या भूमिका मांडत आहेत.

असे असेल नवे सूत्र

नववीतील गुणांचे ५० टक्के आणि दहावीतील अंतर्गत मूल्यमापन गुणांचे ५० टक्के गुण वापरून दहावीचा अंतिम निकाल जाहीर होणार आहे. दहावी अंतर्गत मूल्यमापन करताना विद्यार्थ्यांचे दहावीचे वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापनाला ३० गुण तर गृहपाठ, तोंडीपरीक्षा प्रात्यक्षिक परीक्षा यांच्या आधारे २० गुण दिले जाणार आहेत.

काही विद्यार्थी खूश तर काहींचा हिरमोड

राज्य शासनाने २८ मे रोजी निर्णय जाहीर करीत दहावी परीक्षेचा तिढा सोडविला. मूल्यमापनाचे धोरण जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांना उत्तीर्णची गुणपत्रिका मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंद व्यक्त आहे. तर हुशार विद्यार्थ्यांनी परीक्षेची जोरात तयारी केली होती, त्यांच्यामध्ये हिरमोड बघायला मिळत आहे.

एकंदरीत पाहता विद्यार्थ्यांची परीक्षा व्हायला हवी होती. आता नववी व दहावीच्या गुण आधारे मूल्यमापनाचे धोरण जाहीर करून निकाल देणार आहेत. सर्वच विद्यार्थी पास होतील यात शंका नाही परंतु खरी कसोटी ही परीक्षा देऊनच कळणार होती -

मनोज दलाल, पालक

दहावीच्या अंतर्गत मूल्यमापन करताना वर्षभरातील लेखी मूल्यमापनाला महत्त्व दिले जाणार आहे. गुणांकन व मूल्यमापन केले ही चांगली बाब आहे, मात्र विद्यार्थ्यांच्या अभ्यास मेहनतीचा विचार व्हायला हवा होता. परीक्षा व्हायला हवी होती असेच वाटते.

संतोष गणवीर, पालक

पुढील प्रवेशाचे काय होणार आता?

अंतर्गत मूल्यमापन निकाल जाहीर करण्यात येणार आहे, परंतु पालकगण संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे. सध्यातरी मूल्यमापन, गृहपाठ, तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा याला थोडा फार वेळ लागणार असल्याने पालकांमध्ये पुढील प्रवेशाबाबत संभ्रम दिसून येत आहे.

राज्य शासनाच्या दिशा- निर्देशानुसार इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत पुढील प्रवेशाबाबत भाकित करणे योग्य होणार नाही. गृहपाठ, तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा होताच निकाल जाहीर करण्यात येईल. जारी केलेल्या निकाल सूत्राचे पालन केले जाणार आहे.

- मनोहर बारस्कर,

शिक्षणाधिकारी, भंडारा

एकंदरीत तसे पाहता विद्यार्थ्यांची दहावीची परीक्षा व्हायला हवी होती. आता मूल्यमापनाच्या आधारे धोरण जाहीर झाले आहे. विद्यार्थी आता सीईटी होणार या उपक्रमासाठी गुंतले आहेत. पुढील प्रवेशासाठी स्वतंत्र सीईटी होत असली तरी ती ऐच्छिक असल्याने विद्यार्थी त्यात सहभागी होतील किंवा नाही हे कालांतराने कळेलच.

- केशर बोकडे,

प्राचार्य, शास्त्री विद्यालय भंडारा

इयत्ता दहावी व बारावीचे वर्ष हे टर्निंग पॉईट म्हणून ओळखले जाते. अशा आधारे गुणांकन व मूल्यमापन केले तर ते सोयीचे ठरू शकते, मात्र परीक्षा घेणेही आवश्यक बाब आहे. आता पुढील एका महिन्यातच पुढील प्रवेशाबाबत गुंता सुटेल, असे आम्हाला वाटते. पण कुठेही संभ्रमता नसावी, प्रक्रियेत स्पष्टपणा असावा.

- अशोक पारधी,

कार्याध्यक्ष, विदर्भ मुख्याध्यापक संघ

Web Title: Tenth result of all schools is one hundred percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.