दहावीत वैष्णवी व प्रतीक्षा अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2019 01:02 AM2019-06-09T01:02:18+5:302019-06-09T01:03:06+5:30
दहावीच्या परीक्षेत येथील जेसीस कॉन्व्हेंटची विद्यार्थिनी वैष्णवी विजय हिंगे आणि प्राईड कॉन्व्हेंटची विद्यार्थिनी प्रतीक्षा प्रमोद बेदपुरिया समान ९५ टक्के गुण घेऊन जिल्ह्यात अव्वल आल्या आहेत. जिल्ह्याचा निकाल ६५.९८ टक्के लागला असून गतवर्षीपेक्षा २०.६५ टक्क्यांनी निकाल घटला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : दहावीच्या परीक्षेत येथील जेसीस कॉन्व्हेंटची विद्यार्थिनी वैष्णवी विजय हिंगे आणि प्राईड कॉन्व्हेंटची विद्यार्थिनी प्रतीक्षा प्रमोद बेदपुरिया समान ९५ टक्के गुण घेऊन जिल्ह्यात अव्वल आल्या आहेत. जिल्ह्याचा निकाल ६५.९८ टक्के लागला असून गतवर्षीपेक्षा २०.६५ टक्क्यांनी निकाल घटला आहे.
भंडारा जिल्ह्यातून यंदा दहावीच्या परीक्षेला २८३ शाळांचे १७ हजार ५९० विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ११ हजार ६०७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात १६७६ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत तर ५०५२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. नागपूर विभागात भंडारा जिल्हा तिसऱ्या स्थानी राहिला. यंदाही मुलींनीच बाजी मारली असून जिल्ह्यातील ७४.५६ टक्के मुली उत्तीर्ण झाल्यात. जिल्ह्यातून ८ हजार ५५९ विद्यार्थिनी परीक्षेला बसल्या होत्या. त्यापैकी ६ हजार ३८२ मुली उत्तीर्ण झाल्या. तर ९ हजार ३१ मुलांपैकी ५ हजार २२५ मुले उत्तीर्ण झाले. त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ५७.८६ टक्के आहे.
भंडाराच्या जेसीस स्कुलची विद्यार्थिनी वैष्णवी विजय हिंगे ही दहावीच्या परीक्षेत ५०० पैकी ४७५ म्हणजे ९५ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाली. वरठी येथील राहणाºया वैष्णवीचे वडील रेल्वेत कार्यरत होते. दोन वर्षापूर्वीच त्यांचे निधन झाले. वडीलांच्या निधनानंतर आईने वैष्णवी व तिच्या बहिणीला शिक्षणासाठी प्रोत्साहित केले. वैष्णवीला एनडीए मध्ये जायचे आहे. जेसीस स्कुलच्या मुख्याध्यापिका रंजना दारवटकर, संस्थाचालक मुकेश पटेल, मोहन निर्वाण, कल्याण भलगट, महेश पांडे आदींनी तिचा शाळेत सत्कार केला. तर प्राईड कॉन्व्हेंटची प्रतीक्षा प्रमोद बेदपुरिया ही सुद्धा ५०० पैकी ४७५ गुण घेऊन उत्तीर्ण झाली. प्रतीक्षाचे वडील मोहाडी तालुक्यातील सालेबर्डी येथे जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक आहेत तर आई गृहिणी आहेत. नियमित आठ तास अभ्यास करणाऱ्या प्रतीक्षाला डॉक्टर व्हायचे आहे.
गतवर्षीपेक्षा यंदा जिल्ह्याचा निकाल २०.६५ टक्क्यांनी घटला आहे. गतवर्षी भंडारा जिल्ह्याचा निकाल ८६.६४ टक्के लागला होता.
सहा शाळा १०० टक्के
भंडारा जिल्ह्यातील २८३ शाळांचे विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. त्यापैकी सहा शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. त्यात जवाहरनगर येथील आॅर्डीनन्स फॅक्टरी सेकंडरी स्कुल, तुमसर तालुक्यातील गोबरवाही येथील सावित्रीबाई मेमोरियल विद्यालय, साकोली येथील कृष्णमुरारी कटकवार इंग्लीश हायस्कुल, पवनी येथील पवन पब्लिक स्कुल, लाखनी तालुक्यातील गडेगाव येथील हायसिंथ लिटल फ्लावर स्कुल आणि लाखांदूर येथील विद्या विहार मंदिरचा समावेश आहे. तर लाखनी तालुक्याचा निकाल ७२.५७, भंडारा ७१.३७, साकोली ६९.१६, पवनी ६४.११, लाखांदूर ६२.३८, तुमसर ६०.९५, मोहाडी ५९.७१ टक्के आहे.