लग्नावरुन परतताना नाकाडोंगरीजवळ भीषण अपघात : तीन जणांचा मृत्यू, एक गंभीर
By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: April 22, 2025 12:08 IST2025-04-22T12:06:26+5:302025-04-22T12:08:28+5:30
Bhandara : लग्नकार्य पार पाडून गावी परतत असताना रामनगरजवळ दुर्दैवी घटना

Terrible accident near Nakadongri while returning from a wedding: Three people died, one seriously injured
गोपालकृष्ण मांडवकर
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : तुमसर ते मध्यप्रदेशाकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर नाकाडोंगरी समोर पाथरी गावाजवळील रामनगर येथे सोमवारी रात्री सुमारे बारा वाजताच्या दरम्यान दुर्दैवी अपघात झाला. या भीषण अपघातात पाच वर्षीय चिमुकलीसह तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे. चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले.
प्राप्त माहितीनुसार, चिखला (माईन) येथील कैलाश मरकाम, त्याची पत्नी पार्वता कैलाश मरकाम शेजारी सुषमा दुर्गाप्रसाद कंगाली आणि तिची पाच वर्षीय मुलगी यामीनी दुर्गाप्रसाद कंगाली हे दुचाकीने मध्यप्रदेशातील बोनकट्टा येथे लग्न सोहळ्यासाठी गेले होते. लग्नकार्य पार पडल्यावर ते रात्री आपल्या गावी परतत असताना रामनगरजवळ दुर्दैवी घटना घडली.
नाकाडोंगरी जवळील चांदमारा येथे मध्यप्रदेशातील हेटी गावाहून आलेल्या वरातीमध्ये छतेरा येथील बोलेरो वाहन क्र MH ३६ H६७१६ (चालक – विनोद गौपाले) सहभागी झाले होते. माहितीप्रमाणे, चालकाने लोभीजवळ एका इसमास धडक दिली, ज्यामुळे संबंधित इसमाने जीव वाचविण्यासाठी धाव घेतली. गोंधळात बोलेरो सुसाट मध्यप्रदेशकडे निघाली. यातच रामनगर याच जवळ वाहनाने समोरून येणाऱ्या दुचाकीला जबर धडक दिली.
या भीषण अपघातात कैलाश मरकाम, (४५) पार्वता मरकाम वय (४०) आणि चिमुरडी यामीनी कंगाली (५ वर्षे , सर्वजण राहणार चिखला) यांचा जागीच मृत्यू झाला, तर सुषमा कंगाली (३०) ही गंभीर जखमी झाली असून तिला भंडारा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तिच्या डोक्याला गंभीर मार लागल्याची माहिती आहे. फिर्यादी विजय कंगाली यांच्या तक्रारी वरुन आरोपी ड्रायव्हर विनोद गौपाले (32 रा.छतेरा, मध्यप्रदेश) याला अटक करून पुढील तपास सुरु आहे.