वाटमारी, घरफोडी, सराफा दुकानात चोरीने दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2021 05:00 AM2021-08-08T05:00:00+5:302021-08-08T05:00:13+5:30
साकोली येथे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पोलीस ठाणे आहे. यासोबतच पोलिसांचा मोठा फौजफाटाही तैनात असतो. तरीही चोरी व वाटमारीच्या घटनात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. गत दोन वर्षांपूर्वी विर्शी येथे बँकेत चोरी झाली होती. चोरट्यांनी लाॅकर शेतात नेऊन गॅस कटरच्या सहाय्याने फोडले होते. रोख व दागिने लंपास केले होते. यानंतर विधानसभा निवडणुकीच्या काळात साकोलीच्या बँक ऑफ इंडिया शाखेत चोरी झाली.
संजय साठवणे
लाेकमत न्यूज नेटवर्क
साकोली : आठवडाभरापूर्वी झालेल्या वाटमारीची शाई वाळत नाही तोच शहरातील दोन सराफा दुकानासह एका डेअरीत चोरी झाली. यापूर्वीही तालुक्यात मोठ्या चोऱ्या झाल्या असून साकोलीची बँक ऑफ इंडिया आणि सानगडीच्या बँकेत चोरी झाली होती. दिवसेंदिवस चोरीच्या घटनात सातत्याने वाढ होत असून नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांच्या रात्रगस्तीचा उपयोग काय असा प्रश्न आता निर्माण होत आहे.
साकोली येथे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पोलीस ठाणे आहे. यासोबतच पोलिसांचा मोठा फौजफाटाही तैनात असतो. तरीही चोरी व वाटमारीच्या घटनात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. गत दोन वर्षांपूर्वी विर्शी येथे बँकेत चोरी झाली होती. चोरट्यांनी लाॅकर शेतात नेऊन गॅस कटरच्या सहाय्याने फोडले होते. रोख व दागिने लंपास केले होते. यानंतर विधानसभा निवडणुकीच्या काळात साकोलीच्या बँक ऑफ इंडिया शाखेत चोरी झाली. अस्थायी कर्मचाऱ्यानेच बनावट चाबी तयार करुन रोख व सोने पळविले होते. त्यानंतर एकोडी येथील स्टेट बँक व एटीएम फोडले. काही दिवसानंतर सानगडी येथील स्टेट बँक अज्ञात आरोपींनी फोडली. लाखो रुपयांचे दागिने लंपास केले.
या घटनांचा विसर पडत असतानाच गत आठवड्यात पळसगाव-गोंडउमरी मार्गावर २२ लाख ५० हजार रुपयांची वाटमारी उघडकीस आली. तांदूळ व्यापाऱ्याच्या दिवाणजीला लुटण्यात आले होते. पोलिसांनी अवघ्या २४ तासात आठ जणांना अटक करुन रोख रक्कमही हस्तगत केली होती. याप्रकरणाची चर्चा सुरु असतानाच शहरातील खेडीकर आणि पुष्पम ज्वेलर्स फोडण्यात आले. पाच लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. सातत्याने चोरीच्या घटना घडत असताना पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सराफा दुकानातील चोरट्यांचा थांगपत्ता नाही
- साकोली येथील खेडीकर ज्वेलर्स आणि पुष्पम ज्वेलर्समध्ये चोरी झाली. चोरट्यांनी सुमारे पाच लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची तक्रार पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिसांनी श्वान पथक, ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. परंतु दोन दिवस झाले तरी चोरट्यांचा माग काढण्यात पोलिसांना यश आले नाही. वाटमारी प्रकरणात अवघ्या २४ तासात लुटारुंना पकडून आपली पाठ थोपटून घेणाऱ्या साकोली पोलिसांना या चोरी प्रकरणातील चोरट्यांचा मात्र अद्यापही अंदाज आला नाही.