दिग्गजांची कसोटी पणाला

By admin | Published: November 15, 2016 12:23 AM2016-11-15T00:23:28+5:302016-11-15T00:23:28+5:30

आडनाव साधर्म्य असणारे व्यक्ती शोधणे, त्यांना उमेदवारीसाठी आग्रह धरणे आणि एकाही उमेदवाराने नामांकन परत घेऊ नये,

The Test Match of the Giants | दिग्गजांची कसोटी पणाला

दिग्गजांची कसोटी पणाला

Next

तिहेरी लढत : भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणूक
भंडारा : आडनाव साधर्म्य असणारे व्यक्ती शोधणे, त्यांना उमेदवारीसाठी आग्रह धरणे आणि एकाही उमेदवाराने नामांकन परत घेऊ नये, अशी व्युहरचना आखण्यापासून शेवटच्या टप्प्यात दुसऱ्या क्रमांकाची मते कशी मिळतील, या दिशेने भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणुकीचा प्रवास सुरू आहे. अवघ्या चार दिवसानंतर होणाऱ्या या निवडणुकीत राष्ट्रवादी-भाजप-काँग्रेस हे तिन्ही पक्ष आमनेसामने असून या निवडणुकीतील लढत चुरशीची होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सेकंड चीफ प्रफुल पटेल यांचे विश्वासू विद्यमान आमदार राजेंद्र जैन हे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. त्यांच्याविरूद्ध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतले डॉ.परिणय फुके हे भाजपचे उमेदवार असून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्या पाठिंब्यामुळे उमेदवारी दाखल केलेले प्रफुल अग्रवाल हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. हे तिन्ही उमेदवार बलाढ्य असल्यामुळे या निवडणुकीत दिग्गजांची कसोटी पणाला लागणार आहे.
सद्यस्थितीत राष्ट्रवादी, भाजप आणि काँग्रेसचे ३८५ च्या जवळपास मतदार वेगवेगळ्या राज्यात भारतभ्रमणाच्या सफरीचा आनंद घेत आहेत. एका पक्षाचे मतदार राजस्थान, उत्तराखंड राज्यात, दुसऱ्या पक्षाचे मतदार केरळ, कर्नाटक राज्यात तर तिसऱ्या पक्षाचे मतदार पश्चिम बंगाल राज्यात ‘पिकनीक’ मनवत आहेत. हे मतदार ‘पिकनिक’च्या ठिकाणी काढलेले फोटो सोशल मिडीयावर अपलोड करीत आहेत. त्यामुळे ते कोणत्या पक्षाचे आणि कोणत्या ठिकाणी आहेत, ते जनतेला कळत आहे. भ्रमणध्वनी सुरू असल्यामुळे ते सर्वांच्या संपर्कातही आहेत. असे असले तरी ज्यांच्या पैशाने या मतदारांची ‘शान की सवारी’ सुरू आहे, त्यांच्याशी प्रामाणिक राहून मतदान करतील कां? याबाबत उमेदवारांना साशंकता आहे. अनेक मतदारांनी तिन्ही उमेदवारांकडून आपले खिसे गरम केल्यामुळे आपला कोण? आणि परका कोण? याचा अंदाज बांधणे उमेदवारांसाठी कष्टप्रद ठरत आहे.
२००४ मध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस-भाजप उमेदवार रिंगणात असताना राजेंद्र जैन हे अपक्ष निवडून आले होते. २०१० मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस-भाजप अशा थेट लढतीत ते बहुमताने विजयी झाले. आता २०१६ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी-भाजप-काँग्रेससह पाच अपक्ष असे आठ उमेदवार रिंगणात आहेत. विजयाचे गणित बांधताना आमचाच उमेदवार विजयी होईल, असे त्या-त्या पक्षाचे नेते विश्वासाने सांगत आहेत. मागील १२ वर्षांपासून प्रत्येक मतदाराच्या प्रत्यक्ष संपर्कात असलेले राजेंद्र जैन मतदारांना आपलेसे करण्यात मुरब्बी आहेत. त्यामुळे निवडणुकीचा निकाल पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
राज्यात विधान परिषदेच्या सहा जागांवर निवडणूक होत असली तरी भंडारा-गोंदिया मतदारसंघाच्या निवडणुकीची सर्व सुत्रे राज्यातील त्या-त्या पक्षाच्या मुख्यालयातून विजयाची व्युहरचना दिग्गजांकडून आखण्यात येत आहे. त्यामुळे या निवडणुकीत दिग्गजांची कसोटी पणाला लागलेली असल्यामुळे निकालाअंतीच चर्चांना पूर्णविराम मिळणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: The Test Match of the Giants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.