टीईटी परीक्षा होणार ३१ ऑक्टोबरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:39 AM2021-09-23T04:39:49+5:302021-09-23T04:39:49+5:30
इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यमे, अनुदानित, तसेच विनाअनुदानित, कायम ...
इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यमे, अनुदानित, तसेच विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षण सेवक, शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांनी या परीक्षेत उत्तीर्ण होणे शासनाने अनिवार्य केले आहे. परीक्षेशी संबंधित सर्व माहिती परिषदेच्या mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यापूर्वी १० ऑक्टोबर २०२१ ला टीईटी परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली होती. मात्र, केंद्रीय लोकसेवा आयोगाची लेखी परीक्षा याच दिवशी असल्याने शिक्षक परिषदेच्या वतीने टीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे आता ही परीक्षा ३१ ऑक्टोबर रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात नव्याने वेळापत्रक जाहीर केले असून, सुधारित वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवेशपत्राची ऑनलाइन प्रिंट १४ ते ३१ ऑक्टोबरपर्यंत काढून घ्यावी, असे सांगितले आहे. सन २०१८-१९ नंतर आता परीक्षा होणार आहे. दरवर्षी सात लाख प्रशिक्षार्थी ही परीक्षा देतात; परंतु गेल्या दोन वर्षांत परीक्षा न झाल्याने यंदा अंदाजे दहा लाख विद्यार्थी परीक्षेला बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
बॉक्स
१४ ते ३१ ऑक्टोबरपर्यंत प्रवेशपत्र ऑनलाइन उपलब्ध
शिक्षण परिषदेने शिक्षक पात्रता परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले होते. मात्र, आता नव्याने तारखेत बदल झाला असून, ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या टीईटी परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्रामध्ये शिक्षक भरतीसाठी होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया ३ ऑगस्टपासून सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महाराष्ट्र टीईटी २०२१ साठी अधिकृत वेबसाइट mahatet.in वर जाऊन ऑनलाइन नोंदणी करू शकता. महाराष्ट्र टीईटी २०२१ परीक्षा ३१ ऑक्टोबरला होणार आहे. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर १ आणि २ सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात होणार आहे.