पर्यावरण संवर्धनासाठी कापडी पिशव्या उत्तम पर्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:25 AM2021-06-18T04:25:12+5:302021-06-18T04:25:12+5:30
महाराष्ट्र शासनाच्या पॉलिथीनमुक्त कार्यक्रमाच्या प्रसार व प्रसिद्धीचा भाग म्हणून महिला आर्थिक विकास महामंडळ, मुंबई व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ...
महाराष्ट्र शासनाच्या पॉलिथीनमुक्त कार्यक्रमाच्या प्रसार व प्रसिद्धीचा भाग म्हणून महिला आर्थिक विकास महामंडळ, मुंबई व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहकार्याने महाराष्ट्रातील ३५ जिल्ह्यात ७० लोकसंचालित साधन केंद्राच्या माध्यमातून ९ लाख ५५ पिशव्या शिलाईचे काम महिला बचत गटातील महिलांनी केले आहे. याकरिता मुंबई येथील माविम मुख्यालयातील कार्यक्रम व्यवस्थापक गौरी दोंदेगौरी दोंदे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. कापडी पिशव्यांकरिता कापड व इतर साहित्यासंबंधित लोकसंचालित साधन केंद्रास पुरवठा करण्यात आलेला असून, लॉकडाऊन व कोरो काळात महिलांना घरबसल्या रोजगार देण्याचे कार्य माविमच्या वतीने सुरू करण्यात आलेले आहेत. महिला आर्थिक विकास महामंडळ, भंडाराच्या वतीने नवप्रभा लोकसंचालित साधन केंद्र, भंडारा व शक्ती लोकसंचालित साधन केंद्र, तुमसरच्या वतीने २० हजार कापडी पिशवी शिलाईचे कार्य केले असून, दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत स्थापित शहरातील महिला बचत गटातील ४० टेलरिंग काम करणाऱ्या महिलांना लॉकडाऊन काळात घरबसल्या रु १५० ते २०० पर्यंत रोजगार प्राप्त करून देण्यात आलेला आहे. पिशव्यांची शिलाई पूर्ण झाली असून, महिला आर्थिक विकास महामंडळ, भंडाराच्या वतीने जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रातील शाळेत याचे विनामूल्य वितरण केले जाणार आहे. कोविडकाळात महिलांच्या हाती काम देणे व अनुभवी महिलांची निवड करून रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचे कार्य माविम भंडाराच्या वतीने शक्ती लोकसंचालित साधन केंद्र, तुमसर व्यवस्थापक मंदा साकोरे व नवप्रभा लोकसंचालित साधन केंद्र, भंडारा व्यवस्थापक रंजना खोब्रागडे व त्यांची टीम करीत आहेत.
कोट
संचारबंदीच्या काळात महिला बचत गटातील महिलांच्या हाताला काम मिळावे व त्यांची आर्थिक परवड होऊ नये यादृष्टीने माविंमचा हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. यामुळे बचत गटातील महिलांना रोजगार तर मिळाला आहेच. सोबतच पर्यावरणाचे रक्षण होणार आहे. प्लास्टिक पिशव्यांना या कापडी पिशव्या योग्य पर्याय ठरल्याने नागरिकांमध्ये एक चांगला संदेश पोहचणार आहे.
- प्रदीप काठोळे समन्वयक माविम, भंडारा