बनावट दारु कारखाना उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 09:27 PM2018-10-17T21:27:54+5:302018-10-17T21:28:17+5:30
बनावट विदेशी मद्य कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाड मारुन एक लाख रुपयांच्या विदेशी दारुसह सोळा हजार झाकणे, कॉक, बुच आणि दारु तयार करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई शहरातील राजगुरु वॉर्डात मंगळवारी रात्री करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : बनावट विदेशी मद्य कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाड मारुन एक लाख रुपयांच्या विदेशी दारुसह सोळा हजार झाकणे, कॉक, बुच आणि दारु तयार करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई शहरातील राजगुरु वॉर्डात मंगळवारी रात्री करण्यात आली.
सौरव राजु बोरकर (२४) रा. गांधी वॉर्ड छोटा बाजार, अमित मनोहर निनावे (३०) रा. राजगुरुवॉर्ड भंडारा अशी आरोपींची नावे आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन अमित निनावे यांच्याकडे छापा मारण्यात आला. त्यावेळी हे दोघे विदेशी दारु तयार करताना आढळून आले. त्यांच्या जवळून मध्यप्रदेश राज्यातील निर्मित व विक्रीस आलेली ७५० मिली क्षमतेची २५ सिल्व्हर जेट व्हिस्की बॉटल, १८० मिली क्षमतेची १७० बनावट एंम्पीरियल ब्ल्यू विस्की बॉटल, १८० मिली क्षमतेची रॉयल स्टॉप विस्की ६० बॉटल, मॅकडोव्हेल्स् विस्कीच्या १४० बॉटल, आॅफीसर चॉईस ब्ल्यू विस्कीच्या १७० बॉटल व सहा लिटर रसायन जप्त करण्यात आले. तसेच विविध कंपण्यांची १६ हजार झाकणे कॉक बुच व दारु बनविण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी सौरव बोरकर व अमित निनावे यांना अटक करण्यात आली.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त अश्विनी जोशी, संचालक सुनील चव्हाण, उपआयुक्त उषा वर्मा, अधीक्षक शशिकांत गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
नामांकित ब्रॅण्डची नक्कल
मध्यप्रदेश राज्यात निर्मित नामांकित विदेशी ब्रॅण्डची नक्कल करुन सणासुदीच्या काळात विक्रीसाठी ही बनावट दारु तयार करण्यात आल्याचे या धाडीने उघड झाले. बनावट विदेशी दारु रिकाम्या बाटल्यामध्ये भरुन विकली जाते. ही दारु नागरिकांच्या आरोग्यासाठी अधिक हानीकारक असते.