दीड लाख रूपयांची बनावट विदेशी दारु जप्त
By Admin | Published: April 4, 2017 12:28 AM2017-04-04T00:28:22+5:302017-04-04T00:28:22+5:30
बनावट विदेशी दारु बनवून ती विकणाऱ्या अड्यावर पोलिसांनी छापा घातला. या कारवाईत दीड लाखांच्या दारुसाठ्यासह दोघांना अटक केली.
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : दोन आरोपींना अटक, राष्ट्रीय महामार्गावरील दुकानांच्या बंदीनंतर अवैध विक्री वाढली
भंडारा : बनावट विदेशी दारु बनवून ती विकणाऱ्या अड्यावर पोलिसांनी छापा घातला. या कारवाईत दीड लाखांच्या दारुसाठ्यासह दोघांना अटक केली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भंडारा शहरातील लाल बहादूर शास्त्री वॉर्डात केली.
रामना नरेश नगराळे (२८) रा. लाल बहादूर शास्त्री वॉर्ड व सौरभ राजु बोरकर (२३) रा. गांधी वॉर्ड छोटा बाजार भंडारा असे अटक करण्यात आलेल्या बनावट दारु विक्री करणाऱ्यांची नावे आहेत. भंडारा शहरातील लाल बहादूर शास्त्री वॉर्डातील शांताबाई नागदेवे यांच्या मालकीच्या घरी हे दोघे भाड्याने राहत होते. या दोघांनीही बेकायदेशिररित्या बनावट विदेशी दारु तयार करण्याच्या छोटा कारखाना सुरु केला. या ठिकाणावरुन त्यांनी तयार केलेली बनावट विदेशी दारु छुप्या मार्गाने बाजारात विक्रीला आणली होती. दरम्यान ही बाब गुप्तहेराकडून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांना मिळाली.
या माहितीवरुन त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारला लाल बहादूर शास्त्री वॉर्डातील शांताबाई नागदेवे यांच्या घरी छापा घातला. यावेळी बनावट विदेशी दारु बनविताना रामना नगराळे व सौरभ बोरकर यांना ताब्यात घेतले. दोघांविरुध्द भंडारा पोलिसात महाराष्ट्र दारुबंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दोघांचीही कसून चौकशी सुरु असून त्यांनी यापूर्वी हा दारुसाठा कोठे विकला याबाबद अधिक माहिती घेण्यात येत आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू, अप्पर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर, सहायक फौजदार प्रितीलाल रहांगडाले, पोलीस हवालदार वामन ठाकरे, पोलीस निरीक्षक रमेश चोपकर, पोलीस शिपाई चेतन पोटे, अनुप वालदे, चालक मनोज अंबादे यांनी केली. (शहर प्रतिनिधी)
अशी बनवायचे बनावट दारु
मध्यप्रदेशातून सिल्वर जेट दारु, अल्कोहोल लिक्वीड व साखरेला जाळून केलेला रंग यांचे मिश्रण तयार करण्यात येत होते. त्यात घरालगतच्या नाल्यातील गढूळ पाणी मिश्रीत करुन बनावट दारु तयार केली जात होती. मार्केटमधून इंग्रजी दारुचे खाली पव्वे खरेदी करुन त्यात ती बनावट दारु भरुन त्यावर मध्यप्रदेशातून आणलेले सिल लॉक लावून सिलबंद करुन ते दारुचे पव्वे बाजारात छुप्या मार्गाने विकण्यात येत होते.
छाप्यात हे साहित्य केले जप्त
या कारवाईत दोघांकडूनही व्हिस्की, बनावट दारुने भरलेल्या सीलपॅक ७२ दारुच्या बॉटल, एका पांढऱ्या रंगाच्या पाच लिटरच्या प्लॅस्टीक कॅनमध्ये पाच लिटर बनावटी दारुचे मिश्रण, एका प्लॅस्टीक कॅनमध्ये तीन लिटर अल्कोहोल लिक्वीड, या इंग्रजी दारुचे शिशीला लावण्यात आलेले वेगवेगळ्या व्हीस्कीचे ५३० झाकण, झाकणावरील १२४ सील कव्हर, ४५० नग झाकणावरील सील कव्हर, २४९ सील कव्हर, २३० नग झाकण, ८८ नग झाकण, प्लॉस्टीक बॉटलमध्ये बनावटी दारुमध्ये रंग येण्याकरिता साखरेला जाळून तयार केलेला गडद लाल रंग, अन्य विदेशी कंपण्यांची झाकणे असा १ लाख ५१ हजार रुपयांचा साहित्य साठा जप्त केला.